चॅम्पियन्स लीग तसेच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांसह युरोपमधील १००पेक्षा अधिक सामने निश्चित करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर फुटबॉलविश्वात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचे मूळ सिंगापूरमध्ये असल्याने सिंगापूर आता दडपणाच्या छायेत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला असला तरी सिंगापूरवासीयांनी मात्र आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचे म्हटले आहे. सिंगापूरमधील काही सरकारी प्रसारमाध्यमांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले असले तरी तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणामुळे सिंगापूरसारख्या श्रीमंत बेटाच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे.
फुटबॉलमधील अनेक सामने निश्चित करण्यासाठी सिंगापूरमधूनच सर्व हालचाली होत असत. चॅम्पियन्स लीग आणि फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामने सिंगापूरमधूनच निश्चित केले गेले आहेत, असे युरोपच्या पोलिसांनी म्हटले आहे. युरोपियन गुन्हे शाखा अर्थात युरोपोलच्या म्हणण्यानुसार, पाच देशांतील तपासयंत्रणेनुसार, सिंगापूरमधील एका रॅकेटने जगभरातील फुटबॉलपटू, सामनाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन तब्बल ३८० सामने निश्चित केले आहेत. युरोपबाहेरील आफ्रिका, आशिया तसेच दक्षिण आणि मध्य अमेरिकेतही सामनानिश्चितीचे जाळे पसरले आहे. येथून ३०० सामने निश्चित करण्यात आले आहेत.
२०११मध्ये विल्सन राज पेरुमल याला फिनलँडमध्ये तुरुंगात जावे लागल्यामुळे सामनानिश्चितीप्रकरणी सिंगापूरची भूमिका याआधीच स्पष्ट झाली होती.
त्याचबरोबर सामनानिश्चितीच्या एका मोठय़ा रॅकेटप्रकरणी इटलीला डॅन टॅन हा संशयित आरोपी हवा आहे. सामना निश्चितीमुळे सिंगापूरची प्रतिमा मलिन होणार असून या प्रकरणी सिंगापूरमधील फुटबॉल पदाधिकारी कशी कारवाई करताहेत, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singapore is under preasure on match fixing matter in football