पीटीआय, सिंगापूर : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने रविवारी चीनच्या वांग झी यी हिला पराभूत करत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. सिंधूने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या वांगला २१-९, ११-२१, २१-१५ असे नमवत हंगामातील तिसरे अजिंक्यपद मिळवले. यापूर्वी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आता सिंगापूर स्पर्धेतील विजेतेपदामुळे आगामी राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी सिंधूचा आत्मविश्वास वाढला आहे.
सिंधूने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेमध्ये वांगवर विजय नोंदवला होता. त्यामुळे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूचे पारडे जड होते. या लढतीत सिंधूला विजय मिळवण्यात यश आले; पण दोन्ही खेळाडूंनी बऱ्याच चुका केल्या. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीचे दोन गुण गमावले. यानंतर तिने आक्रमक खेळ केला आणि सलग ११ गुणांची कमाई करत मध्यांतराला ११-२ अशी आघाडी मिळवली. आपली हीच लय कायम ठेवत तिने गेम २१-९ असा सहज जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये वांगने आपला खेळ उंचावला. या गेमच्या विश्रांतीच्या वेळी वांगकडे ११-३ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वांगच्या काही चुकांचा फायदा घेण्यात सिंधू अपयशी ठरली. दुसरीकडे, वांगने चांगल्या स्मॅशचा वापर करत सलग गुण मिळवत गेम २१-११ असा जिंकला आणि सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. सुरुवातीला या दोघींमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. मात्र, सिंधूने अधिक आक्रमकता दाखवली आणि ड्रॉप शॉटच्या साहाय्याने गुणांची कमाई केली. गेमच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-६ अशी पाच गुणांची आघाडी होती. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर वांगने झटपट गुण मिळवत सिंधूची आघाडी ११-१२ अशी कमी केली. मात्र, सिंधूने संयमाने खेळ करत पुन्हा आपली आघाडी १८-१४ अशी आघाडी वाढवली. अखेर सिंधूने हा गेम २१-१५ अशा फरकाने जिंकत सामना आणि स्पर्धेवरही वर्चस्व गाजवले.
गेल्या काही स्पर्धामध्ये मला उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर हा अडथळा पार करण्यात यश मिळाल्याचे मला समाधान आहे. माझ्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. आता आगामी स्पर्धामध्ये हीच लय कायम राखत दमदार कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– पीव्ही सिंधू