बॅडमिंटनमध्ये सध्या आम्हास अपेक्षेइतके यश मिळत नसले तरी आणखी तीन-चार वर्षांमध्ये आमची कामगिरी लक्षणीय असेल, असा आत्मविश्वास सिंगापूरची उदयोन्मुख खेळाडू लियांग झिओयु हिने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.
लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन क्लबने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेसाठी तिला द्वितीय मानांकन देण्यात आले होते. अंतिम सामन्यात तिला चुरशीच्या लढतीनंतर भारताच्या ऋत्विका शिवानीकडून पराभूत व्हावे लागले. पहिली गेम जिंकल्यानंतरही तिने हा सामना गमावला.
अंतिम सामन्यात माझी सुरुवात चांगली झाली होती. दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला माझा खेळ चांगला झाला, मात्र नंतर मी खूपच नकारात्मक खेळ केला. काही अक्षम्य चुकांचा फायदा शिवानीला मिळाला अन्यथा हा सामना आणि पर्यायाने विजेतेपद मला मिळाले असते असे लियांगने सांगितले. ती म्हणाली, अंतिम सामन्याच्या वेळी माझ्यावर थोडेसे दडपण होते. त्याचाही परिणाम माझ्या खेळावर झाला. अर्थात येथील स्पर्धेपासून मला खूप काही शिकावयास मिळाले आहे. त्याचा उपयोग भविष्यात मी निश्चित घेऊ शकेन.
सिंगापूरमध्ये या खेळासाठी किती प्रोत्साहन दिले जाते असे विचारले असता लियांग म्हणाली, गेल्या सहा-सात वर्षांमध्ये या खेळासाठी अतिशय प्रोत्साहन मिळत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच आम्हास परदेशातील अनेक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळत आहे. त्याचाही फायदा आम्हा युवा खेळाडूंना मिळणार आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीवरही सराव शिबिरात भर दिला जात आहे.
साईना नेहवालची मी खूप चाहती आहे. तिचा खेळ पाहण्याची संधी मला मिळाली आहे. तिच्यासारखी जिद्द, निष्ठा व आत्मविश्वास मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. भारतामधील आयबीएल स्पर्धेविषयी आम्हासही उत्सुकता होती. अशा स्पर्धामध्ये खेळाडूंचा अनुभव वाढण्यास मदत होणार आहे. कदाचित भविष्यात मलाही या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल अशी मला आशा आहे. भारतामधील स्पर्धामध्ये भाग घेण्यास मला नेहमीच आवडते. पुन्हा येथे स्पर्धा खेळण्यासाठी मी निश्चित येईन असेही लियांगने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा