खो-खो चाहत्यांसाठी उत्सुकतेची असलेली तिसरी आशियाई खो-खो स्पर्धा फेब्रुवारीत मध्य प्रदेशमध्ये आयोजित केली जाणार आहे. अखिल भारतीय खो-खो महासंघाच्या बारामतीमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
या स्पर्धेचे निमंत्रक शरद जपे सांगितले की, ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी मध्य प्रदेश राज्य संघटनेने गतवर्षी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेवेळी दर्शविली होती. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. महासंघाच्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा फेब्रुवारीमध्ये इंदूर किंवा भोपाळ येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत बांगलादेश, चीन, सिंगापूर, श्रीलंका, जपान, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत हे देश सहभागी होणार आहेत.
मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या खासदार सुमित्रा महाजन या खो-खो खेळाच्या चाहत्या असून त्यांनीच या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी अखिल भारतीय खो-खो महासंघाच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश संघटनेने उचलली आहे. पुरुष व महिला या दोन्ही विभागांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, पंच, तांत्रिक अधिकारी व अन्य पदाधिकाऱ्यांची निवास, भोजन व प्रवास आदी व्यवस्था, पारितोषिके आदी खर्चाची जबाबादारी राज्य शासनातर्फे केली जाणार आहे. परदेशी खेळाडूंना व्हिसा मिळविण्याबाबत अडचणी येऊ नयेत यासाठी महाजन यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे विनंती केली आहे. या स्पर्धेकरिता भारतीय संघांची निवड करण्यासाठी येथे सुरू असलेल्या स्पर्धेतून पुरुष व महिला संघांतील प्रत्येकी संभाव्य ३० खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा