IPL 2020 Latest News Update : यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या आधीच महिला प्रीमियर लीगच्या सामन्यांनी क्रिडाविश्वात धुमाकूळ घातला आहे. महिला प्रीमियर लीगची सांगता होताच आयपीएल २०२३ या मोठ्या टुर्नामेंटचा नारळ ३१ मार्चला फुटणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. कारण दोन्ही संघांनी ४-५ वेळा जेतेपदाची माळ गळ्यात घातली आहे. परंतु, आता चेन्नई सुपर किंग्जसाठी एक दुख:द बातमी समोर आली आहे. कारण न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायली जेमिसन पाठीच्या दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळं चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. कायलीच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मेगाला खेळणार असल्याचं सीएसकेनं जाहीर केलं आहे.
मेगालाने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ टी २० सामने खेळले आहेत. पण संपूर्ण टी २० क्रिकेटच्या कारकिर्दीत मेगालाने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. त्याच्या नावावर १३६ विकेट्सची नोंद आहे. सनरायजर्स इस्टर्न केप संघासाठी मेगालाने चमकदार कामगिरी केलीय. नुकताच झालेल्या SA20 लिगमध्ये मेगला चॅम्पियन खेळाडू ठरला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचं पदार्पण होत असून ५० लाखांच्या बोलीवर सीएसकेनं त्याचा संघात समावेश केला आहे. तर कायल जेमिसनला डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात सीएसकेनं १ कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केलं होतं. कायल जेमिसन याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळत होता.
कायल जेमिसनच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मेगाला खेळणार असल्याचं सीएसकेनं त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर जाहीर केलं आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, ३१ मार्च २०२३ ला आयपीएलच्या सामन्यांचा धमाका सुरु होत असून चेन्नई सुपर किंग्ज गुजरात टायटन्स विरोधात पहिल्याच सामन्यात भिडणार आहे. आयपीएलचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.