Six Ball Six Wickets Australian Cricketer Victory: ऑस्ट्रेलियन क्लबच्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्याच्या अंतिम षटकात सहा विकेट्स घेत एक विलक्षण पराक्रम नोंदवला आहे. संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देत गोल्ड कोस्टच्या प्रीमियर लीग डिव्हिजन 3 मधील मुडगेराबाचा कर्णधार गॅरेथ मॉर्गनने हा अनोखा विक्रम केला आहे. संघाच्या पराभवाची खात्री झालेली असताना विरोधी संघाला (सर्फर्स पॅराडाईज) अवघ्या पाच धावांची गरज होती सहा विकेट्स शिल्लक होत्या, अशावेळी मॉर्गनने शेवटचे षटक स्वतः टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि मग जी कमाल झाली त्याने सर्वच थक्क झाले.
मॉर्गनने सलामीवीर जेक गारलँडला ६५ धावांवर बाद केले आणि त्यानंतर पुढील पाच फलंदाजांना गोल्डन डक्सवर म्हणजेच शून्य धावांवर बाद करून माघारी धाडले. या सामन्यानंतर, त्याने षटकाच्या आधी पंचांशी झालेल्या चर्चेविषयी सुद्धा माहिती दिली. तो म्हणाला की, “मी षटक टाकण्याआधी पंचांनी मला असे म्हटले होते की, मला एखादी हॅट्रिक तरी घ्यावी लागू शकते जेव्हा मी सहा विकेट्स घेतल्या तेव्हा त्या पंचांनी माझ्याकडे पाहिले. हे खरंच अविश्वसनीय होतं.”
“जेव्हा मी सलग तीन विकेट्स घेतल्या तेव्हा मला एवढंच माहित होतं की मला हा गेम गमवायचा नाही. वेड लागल्यासारखा मी खेळत होतो, आणि जेव्हा मी शेवटचा चेंडू स्टंपवर आदळताना पाहिला मला स्वतःला विश्वास बसला नाही मी कधीच असं घडलेलं पाहिलं नाही. “
Video: ६ बॉल्स, ६ विकेट्स
हे ही वाचा<< विराट कोहली, शुबमन गिलला गोलंदाजी देण्यामागे रोहित शर्माने केला होता ‘हा’ प्लॅन; म्हणाला, “गरज नसताना..”
मॉर्गनच्या अविश्वसनीय षटकातील प्रथम चार विकेट्स या झेलबाद झालेल्या होत्या तर शेवटच्या दोन विकेट्स या स्टंपवर आदळून मिळालेल्या होत्या. आजवर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक म्हणजे पाच बळी घेण्याचा विक्रम न्यूझीलंडचा नील वॅगनर (२०११), बांगलादेशचा अल-अमीन होसेन (२०१३) आणि भारताचा अभिमन्यू मिथुन (२०१९) यांनी केला आहे.