ICC Best Playing XI Announced in World Cup 2023: अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील आपली सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या आयसीसीच्या संघात ६ भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स या संघात नाही. आयसीसीने रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवले आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा रचिन रवींद्रही या संघाचा भाग नाही. याशिवाय आपल्या स्फोटक फलंदाजीने जगाला प्रभावित करणाऱ्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनाही आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
भारताच्या या ६ खेळाडूंना मिळाले आयसीसीच्या संघात स्थान –
सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या ६ भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे, तर त्यात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. संघात समावेश असलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.
टीम इंडियाच्या सहा, श्रीलंकेचा एक, न्यूझीलंडचा एक, दक्षिण आफ्रिकेचा एक आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू ॲडम झाम्पा यांचा समावेश आहे. आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक या स्पर्धेत सर्वाधिक ४ शतके झळकवणारा खेळाडू होता. याशिवाय डॅरिल मिशेलने ९ डावात ५५२ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने २३ आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने २१ विकेट्स घेतल्या.
आयसीसीची २०२३च्या विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, ॲडम झाम्पा आणि मोहम्मद शमी.