Rohit Sharma Press Conference In WTC Final 2023 : ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं भारताचा संपूर्ण डाव ६३.३ षटकात २३४ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ४४४ धावांचं लक्ष्य गाठण्यात भारताला अपयश आलं. ऑस्ट्रेलियाने भारताचा आख्खा संघ २३४ धावांवर गारद करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयी झेंडा फडकवला. त्यामुळे आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने भारताच्या पराभवाची कारणे सांगितली आहेत.
पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही नाणेफेक जिंकलो आणि त्यानंतर पहिल्या सत्रात गोलंदाजीही चांगली झाली. मात्र त्यानंतर अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी झाली नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला. नाणेफेक जिंकल्यानंतर आमची सुरुवात चांगली झाली, असं मला वाटलं. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना श्रेय दिलं पाहिजे. हेड मैदानात उतरला आणि स्टीव्ह स्मिथसोबत चांगला खेळला. त्यामुळे त्या इनिंगमध्ये आम्हाला फटका बसला. सामन्यात वापसी करणं कठीण असेल, हे आम्हाला माहित होतं. पण आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत आम्ही लढत राहिलो.”
रोहित पुढे म्हणाला, “आम्ही या चार वर्षांसाठी खूप मेहनत घेतली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोनवेळा फायनलचा सामना खेळणं, हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. पण आम्हाला अजून खूप पुढे जायचं आहे. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी मागील दोन वर्षात काय केलं आहे, याचं श्रेय तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकत नाही. संपूर्ण संघाने खूप चांगले प्रयत्न केले. आम्ही फायनल जिंकू शकलो नाही, याचं वाईट वाटतं. पण यापुढे चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत राहू. भारतीय चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. प्रत्येक धाव आणि विकेटसाठी ते चिअर अप करत होते. मी प्रत्येक चाहत्याचे आभार मानतो.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४४४ धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं. शेवटच्या दिवशी स्कॉट बोलॅंडने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेनं नेलं.