वेगवान गोलंदाज चमिराचे पाच बळी

वेगवान गोलंदाज दुशमंथ चमिराच्या पाच बळींच्या जोरावर श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आघाडी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. श्रीलंकेचा पहिला डाव २९२ धावांवर आटोपला. त्यानंतर चमिराच्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडची दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद २३२ अशी अवस्था केली असून ते अजूनही ६० धावांनी पिछाडीवर आहेत. श्रीलंकेने न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजाला ६० धावांमध्ये बाद केल्यास त्यांना आघाडी घेता येईल.

पहिल्या दिवशीच्या ७ बाद २६४ धावांवरून पुढे खेळतना श्रीलंकेला तीन बळींच्या मोबदल्यात २८ धावांची भर घालता आली. दुसऱ्या दिवसाच्या सहाव्याच षटकात टीम साऊथीने श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. मॅथ्यूजने ७ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७७ धावा केल्या. मॅथ्यूज बाद झाल्यावर आठ धावांमध्ये श्रीलंकेचा डाव आटोपला.

न्यूझीलंडने दमदार सुरुवात करत बिनबाद ८१ अशी सुरुवात केली होती. पण त्यानंतर चमिराने अचूक मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांची त्रेधा उडवली. मार्टिन गप्तीलचे अर्धशतक आणि तळाच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी साकारल्यामुळे न्यूझीलंडला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला. गप्तीलने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या. चमिराने या वेळी तिखट मारा करत न्यूझीलंडच्या मधल्या फळीला आणि तळाच्या फलंदाजांना गारद केले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका (पहिला डाव) : ८०.१ षटकांत सर्व बाद २९२ (अँजेलो मॅथ्यूज ७७; टीम साऊथी ३/६३)

न्यूझीलंड (पहिला डाव) : ७८.४ षटकांत ९ बाद २३२ (मार्टिन गप्तील ५०; दुशमंथा चमिरा ५/४७)

Story img Loader