आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकन फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू अवघ्या १०५ धावा करू शकले. पहिल्याच षटकात श्रीलंकेचे दोन खेळाडू तंबूत परतले. तर संघाच्या पाच धावा झालेल्या असताना सलामीला आलेला पाथुम निसांकादेखील अवघ्या तीन धावांवर बाद झाला. मात्र निसांकाला बाद देण्याच्या निर्णयावर श्रीलंकन खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्याच सामन्यात पंचांच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. अफगाणीस्तानने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंका संघाकडून पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस सलामीला आले. मात्र पहिल्याच षटकात नवीन-उल-हकने मेंडिस आणि असलंका यांना तंबूत पाठवलं. त्यानंतर दुसऱ्याच षटकात चेंटू निसंकाच्या बॅटची किनार पकडत यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर त्याला बाद देण्यात आले. मात्र डीआरएस घेऊनही थर्ड अंपायरने अल्ट्रा एड्जच्या मदतीने त्याला बाद दिले. पंचाच्या या निर्णयावर मात्र श्रीलंकन खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
अफगाणिस्तानचा दणदणीत विजय
दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी दहा षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले. फगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या हजरतुल्ला जझाई- रहमानउल्ला गुरबाज या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. हजरतुल्ला जझाई याने २८ चेंडूंमध्ये ३७ धावा करत नाबाद खेळी केली. तर गुरबाज याने अवघ्या १८ चेंडूमध्ये ४० धावा करत संघाला विजय सुकर करून दिला. इब्राहीम झरदान (१५) नजीबउल्ला झरदान (२, नाबाद) यांनी संघाला विजय मिळवून दिला.