SL vs AUS Australia’s biggest Test win after 23 years: ऑस्ट्रेलियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. शनिवारी गॅले येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा एक डाव आणि २४२ धावांनी दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा हा परदेशी भूमीवर तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

२३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटीत सर्वात मोठा तिसरा विजय –

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ६ बाद ६५४ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेला पहिल्या डावात १६५ आणि दुसऱ्या डावात २४७ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी भूमीवर तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा ऑस्ट्रेलियाचा चौथा सर्वात मोठा विजय आहे. २३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाने २०० हून अधिक धावा आणि डावांच्या फरकाने कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा घरच्या मैदानावर ३६० धावा आणि एका डावाच्या फरकाने पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंतचे कसोटीतील सर्वात मोठे विजय:

  • डावाने आणि ३६० धावांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध, जोहान्सबर्ग, २००२
  • डावाने आणि ३३२ धावांनी इंग्लंड विरुद्ध, ब्रिस्बेन, १९४६
  • डावाने आणि २५९ धावांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध, गकेबेरहा, १९५०
  • डावाने आणि २४२ ​​धावांनी श्रीलंका विरुद्ध, गॅले, २०२५
  • डावाने आणि २२६ धावांनी भारत विरुद्ध, ब्रिस्बेन, १९४७

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसापासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने शानदार द्विशतक झळकावले. ख्वाजाने २३२ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली, ज्यात त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि पदार्पणवीर जोश इंग्लिसने शतकं झळकावण्याचा पराक्रम केला
स्मिथने १४१ आणि इंग्लिसने १०१ धावांचे योगदान दिले.

अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ६५४/६ धावांवर घोषित केला. या प्रचंड धावसंख्येच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १६५ धावांत आटोपला. त्यानंतर यजमान संघाला फॉलोऑन खेळावा लागला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेला केवळ २४७ धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी एक डाव आणि २४२ ​​धावांनी जिंकली.

Story img Loader