टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये झटपट धावा करणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, जर तुम्हाला सांगितले की, एका संघाने केवळ १८ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या तर? ही कमाल श्रीलंकेच्या संघांने करून दाखवली आहे. काल (११ जून) श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. हा सामना यजमान लंकेने चार गडी राखून जिंकला. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. कारण, त्यांनी शेवटच्या तीन षटकात ५९ धावा ठोकत लक्ष्य गाठले. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने शेवटच्या तीन षटकांत ५९ धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. लंकेच्या या विजयात कर्णधार दासुन शनाकाचा सिंहाचा वाटा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्णधार दासुन शनाकाने २५ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. दासुन शनाकापूर्वी हा विक्रम इसुरु उडानाच्या नावावर होता. त्याने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ४६ धावा केल्या होत्या. या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माईक हसी आणि दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर डुसेन संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. माईक हसीने २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि डुसेनने ९ जून २०२२ रोजी शेवटच्या षटकांमध्ये भारताविरुद्ध ४५ धावा केल्या होत्या.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या शेवटच्या पाच टी ट्वेंटी डावांवर नजर टाकल्यास त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याने गेल्या पाच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये ९४.५ च्या सरासरीने आणि १८७.१२च्या स्ट्राईक रेटने १८९ धावा केल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला यश मिळाले नाही. पहिल्या सामन्यात तो शून्य आणि दुसऱ्या सामन्यात १४ धावा करून बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात मात्र, त्याने ऐतिहासिक खेळी केली.

हेही वाचा – ‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, मालिकेतील शेवटचा सामना जरी श्रीलंकेने जिंकला असला तरी मालिका मात्र, ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs aus sri lanka created record by hitting most runs in last 3 overs of t20 cricket vkk