SL vs AUS Steve Smith becomes 4th Australian to score 10000 runs in Test cricket : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २९ जानेवारीपासून गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डावाची सुरुवात दमदार केली. यानंतर मार्नस लबूशेन दुसऱ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाल्यानंतर स्टीव्हन फलंदाजीला आला. त्याने आपले खाते उघडताच एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात स्टीव्हन स्मिथने प्रभात जयसूर्याचा चेंडूवर एकेरी धाव घेत कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. कसोटीत १०,००० धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकूण १५ वा फलंदाज ठरला. स्मिथने ११५व्या कसोटी सामन्याच्या २०५व्या डावात ही मोठी कामगिरी केली. यासह स्मिथने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांचे मोठे विक्रम मोडीत काढले. स्मिथने ११५ सामन्यांमध्ये १०,००० कसोटी धावा पूर्ण केल्या, तर सचिन तेंडुलकरने हा टप्पा गाठण्यासाठी १२२ कसोटी सामने खेळले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा पार करणारे खेळाडू (सामना) :
- ब्रायन लारा- १११ सामने
- कुमार संगकारा- ११५ सामने
- स्टीव्हन स्मिथ- ११५ सामने
- युनूस खान- ११६ सामने
- रिकी पॉन्टिंग- ११८ सामने
- जो रूट- ११८ सामने
- राहुल द्रविड- १२० सामने
- सचिन तेंडुलकर- १२२ सामने
कसोटी डावांबद्दल बोलायचे झाले तर स्मिथने राहुल द्रविडपेक्षा कमी डावात १० हजार धावांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. द्रविडने २०६ डावांमध्ये ही कामगिरी केली होती, तर स्मिथने २०५ डावांमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठला आहे. सर्वात कमी डावात १० हजार कसोटी धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने १९५ डावांमध्ये १० हजार धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी डावात १० हजार धावा करणारा फलंदाज :
- ब्रायन लारा- १९५ डाव
- सचिन तेंडुलकर- १९५ डाव
- कुमार संगकारा- १९५ डाव
- रिकी पाँटिंग- १९६ डाव
- राहुल द्रविड- २०६ डाव
कसोटीत १० हजार धावा करणारे १५ फलंदाज:
सुनील गावस्कर, ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा, ॲलिस्टर कुक, युनिस खान, जो रूट आणि स्टीव्हन स्मिथ हे १५ खेळाडू आहेत.