Sri Lanka vs Bangladesh, Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४च्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने २१ धावांनी त्यांचा पराभव केला. बांगलादेशचा सुपर-४ मधील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्धही पराभव झाला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर आता बांगलादेशचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे.
बांगलादेशचा डाव २३६ धावांवर आटोपला
४९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मथिसा पाथिरानाने श्रीलंकेचा डाव गुंडाळला. त्याने नसूम अहमदला क्लीन बोल्ड केले. बांगलादेशचा संघ २५८ धावांच्या लक्ष्यासमोर ४८.१ षटकात २३६ धावांवर गारद झाला. श्रीलंकेने हा सामना २१ धावांनी जिंकला. सुपर-४ मधील त्याचा हा पहिलाच सामना होता आणि त्याने दोन गुण मिळवले. दुसरीकडे बांगलादेशला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यातही पाकिस्तानने त्यांचा पराभव केला होता. त्याचे दोन सामन्यांत शून्य गुण आहेत आणि तो स्पर्धेतून जवळपास बाहेर आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २५७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेश संघापुढे २५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना बांगलादेश संघासाठी ‘करो या मरो’ असा होता आणि त्यांचा २१ धावांनी पराभव झाला. श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमाने सर्वाधिक ९३ धावा केल्या. त्याचबरोबर बांगलादेशकडून हसन महमूदने तीन विकेट्स घेतल्या.
सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिसची दमदार खेळी
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून २५७ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा या दोघांनी शानदार अर्धशतके केली. कुसल मेंडिसने ७३ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर सदिरा समरविक्रमाने ७२ चेंडूत ९३ धावा केल्या. या खेळाडूने आपल्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार मारले. या व्यतिरिक्त एकही खेळाडू खेळपट्टीवर मोठी खेळी खेळू शकला नाही.
श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निशांक आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. पाथुम निशांकने ६० चेंडूत ४० धावा केल्या. तसेच दिमुथ करुणारत्नेने १७ चेंडूत १८ धावा केल्या. यानंतर कुसल मेंडिसने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, यानंतर फलंदाजीला आलेले चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासुन शनाका झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसरीकडे, सदिरा समरविक्रमाने संघाची एक बाजू लावून धरली. आता श्रीलंकेचा पुढचा सामना टीम इंडियाविरुद्ध १२ सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे.