SL vs BAN, Asia Cup 2023: आशिया कप २०२३च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला आपल्या गोलंदाजीने चकित केले. या सामन्यात पाथिरानाने शाकिब अल हसनला आपला बळी बनवले. त्याला बाद करण्यात यष्टीरक्षक कुशल मेंडिसने योगदान जास्त होते, त्याने विकेटच्या मागे अप्रतिम झेल घेतला.
बांगलादेशच्या डावातील ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शाकिब अल हसनने कट करण्याचा प्रयत्न केला, जो एक शॉट पिच चेंडू होता, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. चेंडू बॅटच्या आतील भागाला लागला आणि वेगाने विकेटकीपरकडे गेला. कुशल मेंडिसने डावीकडे डायव्ह करत डाव्या हाताने हा शानदार झेल घेतला. अंपायरने फलंदाजाला आऊट देण्यापूर्वी टीव्ही रिव्ह्यूचा वापर केला आणि टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू थेट ग्लोव्हजमध्ये नीट पकडला गेला होता. शाकिब अल हसनला फक्त ५ धावा करता आल्या, त्याने ११ चेंडूंचा सामना केला आणि फक्त एक चौकार मारला.
आशिया चषक स्पर्धेत गुरुवारी (३१ ऑगस्ट) बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात या स्पर्धेच्या चालू आवृत्तीतील पहिला सामना आहे. ब गटात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा हा निर्णय सध्यातरी चुकीचा ठरताना दिसत आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नजमुल हुसेन शांतो ८९ धावांवर बाद झाला, त्याचे थोडक्यात शतक हुकले. तो एकमेव बांगलादेशकडून असा फलंदाज होता ज्याने मोठी खेळी केली. त्याला श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्षणाने क्लीनबोल्ड केले. सध्या बांगलादेशचे १६४ वर ८ विकेट्स अशी धावसंख्या झाली असून अजून आठ षटके बाकी आहेत. त्यामुळे बांगलादेश २०० धावांचा टप्पा तरी गाठणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), ड्युनिथ वेल्स, महिश तीक्षणा, कसून राजिथा, मथिशा पाथिराना.
बांगलादेश: मोहम्मद नईम, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, मेहिदी हसन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.