New Zealand vs Sri Lanka 1st Test: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने शानदार कामगिरी करत भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून, श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड मालिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेली चौथी कसोटी एकतर अनिर्णित राहीली किंवा भारत पराभूत झााला, तर भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा निर्णय या मालिकेवरून ठरेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी ५ विकेट गमावून निराशा केली आहे. श्रीलंकेच्या ३५५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १६२ धावा केल्या आहेत. कीवी संघ अजूनही पाहुण्यांपेक्षा १९३ धावांनी मागे आहे. डॅरेल मिशेल ४० आणि मायकेल ब्रेसवेल ९ धावा करुन क्रीजवर उपस्थित आहेत.
पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुसल मेंडिस (८७) आणि दिमुथ करुणारत्ने (५०) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे श्रीलंकेने पहिल्या दिवशी ६ बा० ३०५ धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी अवघ्या ५० धावांच्या आत किवी संघाने चार विकेट्स घेत पाहुण्यांचा डाव ३५५ धावांत गुंडाळला.
हेही वाचा – WPL 2023 MI vs DC: मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक; दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने केली मात
न्यूझीलंडच्या फलंदाजीची सुरुवात उत्कृष्ट झाली होती. टॉम लॅथम (६७) आणि डेव्हॉन कॉनवे (३०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. असिता फर्नांडोने कॉनवेला बाद करून सलामीची जोडी फोडली आणि येथूनच श्रीलंकेने सामन्यावरील आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. पुढील ९ धावांच्या आत न्यूझीलंडने टॉम लॅथम आणि केन विल्यमसनच्या रूपाने आणखी दोन विकेट्स गमावल्या. डॅरेल मिशेल एक बाजू सांभाळून आहे, परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद होत आहेत. विल्यमसन (१), निकोल्स (२) आणि टॉम ब्लंडेल (७) यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेकडून असिता फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने सर्वाधिक २-२बळी घेतले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी –
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत पहिल्या डावात ४ गडी गमावून ३४७ धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाज आतापर्यंत दुसऱ्या दिवशी निष्प्रभ दिसले आणि त्यांना विकेट्सची आस लागली असून ती मिळाली नाही. दुस-या दिवशी आतापर्यंत २९ षटके टाकली आहेत, मात्र भारतीय संघाला आज एकही विकेट मिळाली नाही. सध्या उस्मान ख्वाजा ३५४ चेंडूत १५० धावा आणि कॅमेरून ग्रीन १४० चेंडूत १०० धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. ग्रीनने कसोटीमध्ये पहिले शतक झळकावले, त्याच्या या खेळीला १६ चौकारांचा साज होता. या दोघांमध्ये आतापर्यंत पाचव्या विकेटसाठी ३०४ चेंडूत १८५ धावांची भागीदारी झाली आहे.