भारताने जे काही तीन-चार महान खेळाडू जगाला दिले आहेत ते म्हणजे मेजर ध्यानचंद, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. पण त्यातही सचिन तेंडुलकरचं नाव अग्रस्थानी आहे. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई हॉकीनं संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. त्यानंतर तब्बल ५० वर्षांच्या कालावधीनंतर सचिन नावाच्या जादूगारानं संपूर्ण जगावर गारुड केलं. आपल्या खेळाच्या जोरावर सचिनने तमाम देशवासीयांना निखळ आनंद मिळवून दिला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असंच सचिनच्या बाबतीत म्हणता येईल. पण सचिनच्या डोक्यात कधीही क्रिकेटची हवा गेली नाही. त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. सचिननं शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आहे. संपूर्ण देशवासीयांना त्याचा अभिमान आहे. अतिशय विनम्र, हुशार आणि इतरांप्रती आदर, सन्मान बाळगणारं, असं सचिनचं व्यक्तिमत्त्व. आम्ही अनेकदा विविध कार्यक्रमांदरम्यान भेटलो. क्रिकेटवर, अन्य खेळांच्या बाबतीत बरीच चर्चा केली. पण प्रत्येक भेटीदरम्यान त्याने पाया पडून मला नमस्कार केला आहे. सचिन मोहालीत आला की मला नक्कीच भेटतो. त्याच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारताना वेळ कसा निघून जातो, हेच कळत नाही. सचिनसारखे अद्वितीय खेळाडू क्वचितच सापडतील, असं मला वाटते. याचं श्रेय नक्कीच सचिनच्या आई-वडिलांना द्यायला हवं. त्याला ज्या वातावरणात घडवलं, संस्कार रुजवले, त्यामुळे सचिनच्या कुटुंबीयांना त्रिवार सलाम!
सचिन नेहमीच खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याने क्रिकेटमध्ये जे उत्तुंग शिखर गाठलं आहे, त्यावरून सचिन हा युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. युवा खेळाडूंनी सचिनकडून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली पाहिजे. प्रत्येक खेळात सचिनसारखे खेळाडू तयार झाले तर ऑलिम्पिकमध्ये किंवा अन्य प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकेल.
सचिनने राज्यसभेतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. सचिनसारख्या खेळाडूला क्रीडा मंत्रालयाचा प्रमुख नेमले, तर देशातील क्रीडाक्षेत्राची झपाटय़ाने प्रगती होईल, असे मला वाटते. एक खेळाडू क्रीडामंत्री झाला तर देशातील खेळांचा आणि खेळाडूंचा दर्जा नक्कीच उंचावेल. खेळाडूंच्या असंख्य अडचणी असतात. मंत्र्यांना आपल्या रोजच्या कामातून खेळासाठी सवड काढणं जमत नाही. त्यामुळे खेळाडूंच्या वेळच्या वेळी गरजा पूर्ण होत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. एक खेळाडूच खेळाडूंच्या समस्या जाणू शकतो. म्हणून सचिनला क्रीडामंत्री बनवलं गेलं, तर ते देशाच्या क्रीडाक्षेत्रासाठी चांगलं होईल. आता पुन्हा सचिन आपल्याला खेळताना दिसणार नाही. पण सचिनला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. पण निवृत्तीनंतर सचिननं राज्यसभेतही जोरदार ‘बॅटिंग’ करावी, हीच त्याच्याकडून अपेक्षा!!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा