पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय; मालिकेत १-० आघाडी
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (वाका) मैदानावर रोहित शर्माने साकारलेल्या धडाकेबाज १७१ धावांच्या खेळीला ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या १४९ धावांच्या दिमाखदार खेळीने झाकोळून टाकले. भारताच्या सुमार गोलंदाजीच्या माऱ्याचा आरामात समाचार घेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट्स राखून दमदार विजय मिळवला.
‘वाका’च्या वेगवान खेळपट्टीवर भारताने रोहितच्या शतकी खेळीच्या बळावर ३ बाद ३०९ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र स्मिथ आणि जॉर्ज बेलीच्या (११२) शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत विजय मिळवत, हे लक्ष्य अपुरे असल्याचे सिद्ध केले.
रोहितने एकदिवसीय कारकीर्दीतील नववे शतक नोंदवले. १६३ चेंडूंत १३ चौकार आणि सात उत्तुंग षटकारांसह साकारलेली खेळी पर्थवरील भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम खेळी ठरली. उपकर्णधार विराट कोहलीने नऊ चौकार आणि एका षटकारानिशी ९१ धावांची धडाकेबाज खेळी साकारून त्याला तोलामोलाची साथ दिली. रोहित-विराट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २०७ धावांची भागीदारी रचली. मात्र भारताच्या खराब गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेता आली. स्मिथनेही १६३ चेंडूंत आपली खेळी उभारली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी माजी कर्णधार बेलीसोबत २४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रोहितची आणखी एक शतकी खेळी वाया गेली. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत रोहितने ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते, परंतु ते अपयशी ठरले.
स्मिथने १३५ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटकारांसह आपली खेळी फुलवली. त्याने पुन्हा एकदा भारताच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. स्मिथची मागील काही सामन्यांतील भारताविरुद्धची कामगिरी (सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये) १६२*, ५२*, १३३, २८, १९२, १४, ११७, ७१, ४७, १०५ अशी आहे. ‘वाका’वरील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरले. भारताच्या दर्जाहीन गोलंदाजीविरुद्ध स्मिथ-बेली जोडीला फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
भारताकडून पदार्पणवीर बरिंदर सरणने (३/५६) आपली छान पाडली. त्याने आरोन फिन्च आणि डेव्हिड वॉर्नर यांचे बळी मिळवून ऑस्ट्रेलिया संघावर दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ मिळाली नाही.
रविचंद्रन अश्विन (९ षटकांत ६८ धावांत २ बळी) आणि रवींद्र जडेजा (९ षटकांत ६१ धावांत ० बळी) या भारताच्या फिरकी जोडगोळीने मात्र निराशा केली. आता ब्रिस्बेनला शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.
१७१*
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माने नोंदवला. ३७ वर्षांपूर्वी विवियन रिचर्ड्सने १५३ धावांची खेळी उभारली होती. तो विक्रम रोहितने मोडीत काढला.
२०७
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी रचली. याआधी सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी १९९ धावांची भागीदारी केली होती
दुसऱ्या लढतीसाठी मार्शला विश्रांती
ब्रिस्बेन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज मिचेल मार्शला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याऐवजी व्हिक्टोरिया आणि मेलबर्नचा वेगवान गोलंदाज जॉन हॅस्टिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. मार्श मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) होणाऱ्या तिसऱ्या लढतीत खेळणार आहे.
धावफलक
भारत : रोहित शर्मा नाबाद १७१, शिखर धवन झे. मार्श गो. हॅझलवूड ९, विराट कोहली झे. फिन्च गो. फॉल्कनर ९१, महेंद्रसिंग धोनी झे. बोलँड गो. फॉल्कनर १८, रवींद्र जडेजा नाबाद १०, अवांतर (लेगबाइज ६, बाइज ४) १०, एकूण ५० षटकांत ३ बाद ३०९
बाद क्रम : १-३६, २-२४३, ३-२८६
गोलंदाजी : जोश हॅझलवूड १०-०-४१-१, जोएल पॅरिस ८-०-५३-०, मिचेल मार्श ९-०-५३-०, स्कॉट बोलँड १०-०-७४-०, जेम्स फॉल्कनर १०-०-६०-२, ग्लेन मॅक्सवेल ३-०-२२-०.
ऑस्ट्रेलिया : आरोन फिन्च झे. आणि गो. सरण ८, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. सरण ५, स्टीव्हन स्मिथ झे. कोहली गो. सरण १४९, जॉर्ज बेली झे. कुमार गो. अश्विन ११२, ग्लेन मॅक्सवेल झे. धवन गो. अश्विन ६, मिचेल मार्श नाबाद १२, जेम्स फॉल्कनर नाबाद १, अवांतर (लेगबाइज ५, वाइड १२), एकूण ४९.२ षटकांत ५ बाद ३१०
बाद क्रम : १-९, २-२१, ३-२६३, ४-२७३, ५-३०८
गोलंदाजी : बरिंदर सरण ९.२-०-५६-३, भुवनेश्वर कुमार ९-०-४२-०, रोहित शर्मा १-०-११-०, उमेश यादव १०-०-५४-०, रवींद्र जडेजा ९-०-६१-०, रवीचंद्रन अश्विन ९-०-६८-२, विराट कोहली २-०-१३-०