ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा सध्याच्या घडीला भारताच्या विराट कोहलीप्रमाणेच विश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहे, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
स्मिथने दोन्ही डावांत साकारलेल्या शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला २५१ धावांनी धूळ चारली. त्यामुळे लेगस्पिनर म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मिथचे विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजात झालेले रूपांतर कौतुकास्पद आहे, असे ४८ वर्षीय लँगर यांना वाटते.
‘‘ज्या वेळी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली, तेव्हा तो लेगस्पिन गोलंदाजी करायचा. त्याचप्रमाणे त्याची खेळण्याची शैलीही इतरांपेक्षा भिन्न असल्याने अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली; परंतु स्मिथने स्वत:हून संघ व्यवस्थापनाला त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायची असल्याचे सुचवले. तेव्हापासून आजपर्यंत स्मिथने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे,’’ असे लँगर म्हणाले.
‘‘विशेषत: अॅशेसच्या दोन्ही डावांत त्याने साकारलेली शतके पाहून माझ्या मते तो भारताच्या कोहलीइतकाच सर्वोत्तम फलंदाज बनला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत मी कोहली विश्वातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असल्याचे म्हटले होते,’’ असेही लँगर यांनी सांगितले.
स्मिथ ‘आयसीसी’ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर
दुबई : पहिल्या अॅशेस कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत शतके झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने भारताच्या चेतेश्वर पुजाराला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली (९२२ गुण) फलंदाजांच्या यादीत अग्रस्थानावर असून आता पुजारा चौथ्या स्थानावर आहे.
दुखापतीमुळे अँडरसन दुसऱ्या कसोटीला मुकणार
लंडन : उजव्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मुकणार आहे. दुखापतीतून सावरून तो इंग्लंड संघात कधी परतणार हे मात्र अनिश्चित आहे.एजबॅस्टन येथील पहिल्या कसोटीत चार षटके गोलंदाजी केल्यानंतर इंग्लंडच्या विक्रमी बळी घेणाऱ्या अँडरसनला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. परंतु तरीही त्याने दोन्ही डावांत ११व्या स्थानावर फलंदाजी केली.