ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली असूनही हे दोघे लवकरच एका स्पर्धेत क्रिकेट खेळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडण्याच्या प्रकरणी या दोघांवर १ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी घालून काहीच दिवस झाले असूनही हे दोघे आता स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
सिडनीच्या क्लब क्रिकेटमध्ये म्हणजेच न्यू साऊथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत हे दोघे खेळणार आहेत. स्टीव्ह स्मिथ हा सदरलँडकडून तर डेव्हिड वॉर्नर हा रँडविक-पीटरशॅम संघाकडून खेळणार आहे. या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेल्या बंदीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नसले, तरीही क्लब क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊ शकणार आहेत.
सध्या भारतात सुरु असलेल्या आयपीएलमध्येही या दोघांना सहभागी होता येणार होते. स्मिथ हा राजस्थान संघाकडून तर वॉर्नर हा हैदराबादच्या संघाकडून खेळणार होता. मात्र त्यांच्या सामन्यातील बॉल कुरतडण्याच्या प्रकरणामुळे त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यास मज्जाव करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात ९ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगणाऱ्या कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याच्या स्पर्धेतील सहभागाबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात या स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या क्लबच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यात येईल.