Smriti Mandhana Crowned ICC Women’s ODI Cricketer of The Year: आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखली जाणारी भारताची डावखुरी सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने २०२४ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारला. २०२४ मधील स्मृतीच्या वनडेमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला आयसीसीने सर्वाेत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू २०२४ चा पुरस्कार दिला आहे. स्मृती मानधनाने या शर्यतीत लोरा वोल्वार्ड, चमारी अट्टापटू, एनाबेल सदरलँड यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
स्मृती मानधनाच्या २०२४ मधील वनडे खेळींमधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्मृतीने कट्टर प्रतिस्पर्धी संघांविरूद्ध मोठी खेळी केल्या. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या निर्भेळ मालिका विजयात मानधनाने लागोपाठ शतकं झळकावली. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिकेच्या निर्णायक सामन्यात उत्कृष्ट शतकाने सामन्याचा रोख बदलत मोठी भूमिका बजावली. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध पर्थमध्ये झालेल्या सामन्यात मानधनाने शतक झळकावत आपल्या कौशल्यांची चमक पुन्हा एकदा दाखवून दिली.
स्मृती मानधना २०२४ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.४६ च्या सरासरीने ७४७ धावा केल्या. यादरम्यान मानधनाने ४ शतकं आणि ३ अर्धशतकं झळकावली. मानधनाता स्ट्राईक रेटही ९६.१५ होता.
पर्थ कसोटीतील शतकासह स्मृती मानधनाने विश्वविक्रम केला होता. १०३ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने स्मृतीने शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेल्या त्या मालिकेत स्मृतीने २ शतकं झळकावली होती. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ वनडे शतक झळकावणारी मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. याआधी कोणत्याही भारतीय महिला क्रिकेटपटूला ही मोठी कामगिरी करता आली नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियन भूमीवर एकापेक्षा जास्त एकदिवसीय शतक झळकावणारी मानधना ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
इतकंच नव्हे तर स्मृती मानधनाचे हे २०२४ मधील चौथे एकदिवसीय शतक होते आणि या शतकासह तिने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात ४ शतकं झळकावणारी मानधना जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. याआधी बेलिंडा क्लार्कने १९९७ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात ३ शतकं केली होती.