ऑस्ट्रेलिया-इंग्लंड-भारत यांच्यात सुरु असलेल्या तिरंगी टी-२० मालिकेत अखेर भारतीय महिला संघाला विजय मिळालेला आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडच्या संघावर ८ गडी राखून मात केली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या महिला संघाला अवघ्या १०७ धावांमध्ये गुंडाळलं. भारतीय संघाने इंग्लडचं आव्हान सहज पार केलं. सलामीवीर स्मृती मंधानाने या सामन्यातही धडाकेबाज खेळी करत ४१ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीपटूंच्या माऱ्यासमोर पुरता कोलमडला. अनुजा पाटील, राधा यादव, दिप्ती शर्मा आणि पुनम यादव या फिरकीपटूंनी मिळून सामन्यात ९ गडी मिळवले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी आक्रमक सुरुवात केली. मिताली राज आणि जेमिया रॉड्रीग्ज लवकर माघारी परतल्यानंतर स्मृती मंधानाने एका बाजूने भारताची बाजू लावुन धरत आपलं आव्हान कायम ठेवलं.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या सोबतीने स्मृती मंधानाने भारताच्या डावाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. या दोन्ही फलंदाजांमध्ये ६० धावांची भागीदारी झाली. अखेर या भागीदारीच्या जोरावर भारताने टी-२० मालिकेत आपला पहिला विजय निश्चीत केला. या सामन्यात विजय मिळवला असला तरीही भारतीय महिलांचा संघ अंतिम फेरी गाठण्यात अयशस्वी ठरला आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातला अंतिम सामना शनिवारी खेळवण्यात येणार आहे.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड महिला १८.५ षटकांत सर्वबाद १०७. डॅनिली वॅट ३१, नतालिया स्किवर १५. अनुजा पाटील ३/२१ विरुद्ध भारत महिला १५.४ षटकांत १०८/२. स्मृती मंधाना नाबाद ६२, हरमनप्रीत कौर नाबाद २०. डॅनिली हेजल २/१७ निकाल- भारतीय महिला ८ गडी राखून विजयी