भारतीय महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगलीचं नाव मोठं करणारी स्मृती मंधानाच्या कामगिरीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून, स्मृतीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. 17 फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत स्मृतीने आपल्या फलंदाजीने सर्वांची मन जिंकली. तिन्ही सामन्यांमध्ये स्मृतीने भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे वाहत आपली भूमिका चोख बजावली. भारतीय महिला संघ मालिकेत एकही सामना जिंकू शकला नसला तरीही स्मृतीने केलेल्या कामगिरीचं फळ तिला मिळालं. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत स्मृती मंधाना सर्वोत्तम 3 फलंदाजांमध्ये आली. या बहुमानानंतर राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे स्मृतीचा आनंद अधिकच द्विगुणीत होणार आहे.

एकूण 88 खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे उदय देशपांडे यांना जीवन गौरव तर माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो सारखी शिखरं सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana awarded prestigious state shivchatrapati sports award