Smriti Mandhana complete 3000 runs in T20 Internationals : भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मंधानाने ५२ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंधानाने तिच्या या खेळीने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तीन हजार धावाही पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडू खेळून हा आकडा गाठणारी ती महिला क्रिकेटपटू ठरली. या बाबतीत तिने न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनचा विक्रम मोडला.
स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अवघ्या २४६१ चेंडूत तीन हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी सोफी डिव्हाईनने २४७० चेंडूंचा सामना केला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग तिसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंडची सुझी बेट्स चौथ्या स्थानावर आहे. लॅनिंगने २५९७ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर बेट्सने २६७९ चेंडूंत तीन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
मंधाना रोहित-कोहलीच्या क्लबमध्ये सामील –
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी मंधाना ही चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर ही कामगिरी नोंदवली गेली आहे. कोहलीने १०७ डावात ४००८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नावावर १४० डावांमध्ये ३८५३ धावा आहेत. हरमनप्रीत कौरने १४३ डावात ३१९५ धावा केल्या आहेत. आता मंधाना या यादीत सामील झाली आहे. तिने १२२ डावात ३०५२ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – AUS vs PAK : ऑस्ट्रेलियातील सलग सहाव्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव, वॉर्नरने विजयासह घेतला निरोप
शफालीबरोबर तिसरी शतकी भागीदारी –
स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शफाली वर्माबरोबर पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. शफालीबरोबर तिने तिसऱ्यांदा टी-२० मध्ये शतकी भागीदारी केली आहे. भारतासाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी ही जोडी ठरली. मंधाना आणि शेफालीने हा पराक्र तीनदा केला आहे. यापूर्वी मंधानाने माजी कर्णधार मिताली राजसोबत दोनदा शतकी भागीदारी केली होती.
स्मृती मंधानाने केला अनोखा विक्रम –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी मंधाना पहिली डावखुरी फलंदाज ठरली आहे. तिच्या मागे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने २८९४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या बिस्माह मारूफने २८९३ आणि श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूने २६५१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीच्या नावावर २५०८ धावा आहेत.