वन-डे मालिकेत 2-1 ने बाजी मारल्यानंतर भारतीय महिलांची टी-20 मालिकेतली सुरुवात खराब झाली आहे. वेलिंग्टन येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांनी भारतीय महिला संघावर 23 धावांनी मात केली. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने आजच्या सामन्यात मिताली राजला संघात स्थान दिलं नव्हतं, त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग करताना मितालीची कमतरता भारताला मोठ्या प्रमाणात जाणवली. भारतीय महिला संघ 136 धावांवर सर्वबाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय महिलांनी डावाची चांगली सुरुवात केली. राधा आणि पुनम यादव या जोडगोळीने न्यूझीलंडच्या सुएझ बेट्स आणि कॅटलिन गुरीला माघारी धाडलं. 47 धावात न्यूझीलंडच्या दोन महिला फलंदाज माघारी परतल्या. मात्र यानंतर सोफी डिव्हाईन आणि कर्णधार अॅमी सॅटरवेटने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. डिव्हाईनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत सुरेख अर्धशतकी खेळी केली. कर्णधार अॅमीनेही 33 धावा पटकावत तिला चांगली साथ दिली. या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी न्यूझीलंडला 159 धावांपर्यंत मजल मारुन दिली.
प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघाची सुरुवातही खराब झाली. नवोदीत प्रिया पुनिया अवघ्या 4 धावांवर माघारी परतली. यानंतर मराठमोळ्या स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्जने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत भारतीय संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. स्मृती मंधानाने 34 चेंडूत 58 धावांची खेळी करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. यादरम्यान स्मृती मंधानाने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू बनण्याचा मानही पटकावला. स्मृतीने 24 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं. या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मात्र या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. न्यूझीलंडच्या ली तहाहूने 3 बळी घेत भारतीय संघाच्या डावाला खिंडार पाडलं. तिला लेह कॅसप्रेकने 2 बळी घेत चांगली साथ दिली. स्मृती आणि जेमायमा रॉड्रीग्जचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.