Why was skipper Harmanpreet Kaur dropped against Nepal : दोन्ही भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. पुरुष संघाला २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्याचवेळी भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया कपमध्ये खेळत आहे. भारतीय महिला संघ आज नेपाळविरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघ मोठा बदल करून मैदानात उतरला आहे. हरमनप्रीत कौरच्या जागी स्मृती मानधना भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर नेपाळसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

श्रीलंकेत अचानक कर्णधार का बदलला?

नेपाळविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात स्मृती मानधना टीम इंडियाची धुरा सांभाळत आहे. कारण संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, हरमनप्रीत कौरला स्पर्धेतील वर्कलोड मॅनेज करण्यासाठी मोठ्या सामन्यांपूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ग्रुप स्टेजच्या पहिल्या दोन सामन्यात संघाची धुरा सांभाळताा दिसली होती. तिच्याशिवाय, पूजा वस्त्राकर देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. तिला पण विश्रांती देण्यात आली आहे.

शफालीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचे नेपाळसमोर १७९ धावाचे लक्ष्य –

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १७८ धावा केल्या. शफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी झाली. हेमलता ४२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाली. त्याचवेळी शफालीने २६ चेंडूत चालू स्पर्धेतील तिचे दुसरे अर्धशतक झळकावले. यानंतर ४८ चेंडूत ८१ धावा करून ती बाद झाली. यादरम्यान तिने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. या सामन्यात भारताला तिसरा धक्का सजीवन सजनाच्या रूपाने बसला. तिला कविता जोशीने एलबीडब्ल्यू आऊट केले. तिला फक्त १० धावा करता आल्या. तर, जेमिमा आणि रिचा यांनी अनुक्रमे २८ आणि सहा धावा करून नाबाद राहिले. नेपाळतर्फे सीता राणाने दोन आणि कविता जोशीने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ‘तेरे इमाम के पूरे करियर पर…’, पाकिस्तानी पत्रकाराने ‘या’ खेळाडूची गांगुलीशी तुलना केल्याने चाहत्यांनी केले ट्रोल

टीम इंडियाचे सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित-

टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर यूएई संघाचा पराभव केला. टीम इंडिया सध्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असून हा सामना जिंकल्यास सेमीफायनलमध्ये पोहोचेल. भारताच्या विजयाचा फायदा पाकिस्तानलाही होणार आहे. वास्तविक, पाकिस्तान संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना हरल्यास नेपाळचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकच्या इतिहासात ‘या’ देशांनी पटकावलीत सर्वाधिक सुवर्णपदकं, जाणून घ्या कोण आहेत टॉप-५ देश?

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन पाहा:

भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, एस सजना, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी.

नेपाळचा महिला संघ: समझौता खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, इंदू बर्मा (कर्णधार), डॉली भट्टा, रुबिना छेत्री, पूजा महतो, कविता जोशी, काजल श्रेष्ठ (यष्टीरक्षक), सबनम राय, बिंदू रावल.