ही गोष्ट आहे तीन वर्षांपूर्वीची. भारतीय महिला संघ इंग्लंडमधल्या निसर्गरम्य अशा ब्रिस्टल इथे टेस्ट मॅच खेळत होता. हा सामना अनिर्णित झाला. शफाली वर्माची ९६ धावांची वादळी खेळी कौतुकास पात्र ठरली पण या टेस्टदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताची शैलीदार फलंदाज स्मृती मन्धानाने या सामन्यात ७८ धावांची खेळी केली. सुरेख पदलालित्य आणि खणखणीत फटके यांचा मिलाफ असणाऱ्या या खेळीदरम्यान ड्रिंक्स ब्रेकमध्ये केस बांधतानाच स्मृतीचा फोटो व्हायरल झाला. खेळताना केसांनी त्रास देऊ नये म्हणून स्मृती केस बांधत होती. ही कोणी अभिनेत्री नव्हे, मॉडेल नव्हे तर ही आहे ब्युटी विथ ब्रेन्स क्रिकेटपटू स्मृती मन्धाना अशा ओळी त्या फोटोबरोबर दिल्या गेल्या. जसजसा तो फोटो व्हायरल होत गेला तसं स्मृतीला ‘नॅशनल क्रश’ अशी बिरुदावलीच मिळाली. क्रश या शब्दाचा पारंपरिक अर्थ चिरडणे, चुरगाळणे. पण पॉप्युलर कल्चर आणि सोशल मीडियाच्या जगात क्रश म्हणजे ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’ असा विषय. क्रशला भेटता येईलच असं नाही. क्रश गर्लफ्रेंड होईलच असं नाही. पण ती पाहिल्यावर पु.ल. म्हणतात तसं ‘महिरलो’ असं वाटतं तीच क्रश. अप्राप्य गोष्टी खपतात या न्यायाने तो फोटो इन्स्टा रील्स, इन्स्टा स्टोरीज इथून सैरावैरा झाला. खरंतर तो सामना स्मृतीचा पदार्पणाचा वगैरे नव्हता. ती पहिल्यांदाच टीव्हीवर दिसली असंही नव्हतं. हा फोटो टिपला गेला तेव्हा ती करिअरमध्ये पुरेशी स्थिरावली होती. पण म्हणतात ना, तुमच्या आयुष्यात स्टारडमचा एक क्षण येतो. स्मृतीसाठी तो क्षण ब्रिस्टलच्या हिरव्यागार कॅनव्हासला साक्ष ठेऊन अवतरला.
‘सांगलीची मुलगी चांगली’ या ऱ्हिदमिक उक्तीला सार्थ ठरत स्मृतीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल स्पर्धेत आरसीबी आणि विराट कोहली हे समानार्थी शब्द आहेत. पण दुर्देव असं की वर्षानुवर्ष धावांची टांकसाळ उघडणाऱ्या विराटच्या संघाला १६ वर्षात एकदाही जेतेपद पटकावता आलं नाही. कारणं काहीही असोत पण जेतेपदाने कोहलीला सुरक्षित अंतरावरच ठेवलं. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत आरसीबीने स्मृती मन्धानाला ताफ्यात घेतलं तेव्हा तिचं नशीब विराटप्रमाणे असू नये अशी प्रार्थना अनेकांना केली. प्रार्थनेत बळ असतं असं म्हणतात. कारण स्मृतीने दुसऱ्याच हंगामात आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. हे यश फक्त छान दिसण्यातून साकारलेलं नाही. या यशामागे अथक मेहनत आहे आणि वीसहून अधिक मुलींची मोट बांधण्याचं कौशल्य आहे. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ बलाढ्य मानला जातो. त्यांच्या ताफ्यात झुंजार खेळासाठी प्रसिद्ध हरमनप्रीत कौर ही भारताची कर्णधार आहे. हरमनप्रीत अर्थात लाडक्या हॅरीदीच्या संघाला हरवणं कठीण पण स्मृतीने ते करुन दाखवलं. मुंबईच्या बरोबरीने गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली या संघांना चीतपट करत आरसीबीने जेतेपदाची कमाई केली.
क्रिकेटचे बाळकडू स्मृतीला घरातूनच मिळालेले. भाऊ क्रिकेट खेळतो म्हणून तिची या खेळाशी ओळख झाली. भाऊ करतोय ते आपणही करावं, असं तिला वाटू लागलं. ती इतकी लहान होती की तिच्या मापाचे क्रिकेटचे कपडेही उपलब्ध नव्हते. भावाच्या क्रिकेट पोशाखातूनच तिच्या मापाचे कपडे आईने तयार केले. हा कस्टमाइज्ड युनिफॉर्म परिधान करून तिने बॅट हातात घेतली. भावाची प्रॅक्टिस झाली की तिला बॅटिंग मिळत असे. दोघांचाही बॅटिंग स्टान्स एकसारखाच. जन्मगावी मुंबईत सुरू झालेलं हे वेड मंधाना कुटुंब सांगलीत स्थायिक झालं, तेव्हाही कायम राहिलं.
मुली-महिला क्रिकेट खेळतात हेच अनेकांना नवं होतं. वडिलांनी मेरठमध्ये झालेल्या U19 स्पर्धेला स्मृतीला नेलं. मोठ्या वयाच्या मुलींचं क्रिकेट आणि त्यातील धोके पाहून ती क्रिकेट सोडेल, असा पालकांचा होरा होता. पण झालं उलटंच. तिचं क्रिकेटचं वेड आणखी पक्कं झालं. आणि अभ्यासाच्या बरोबरीने सुरू झाला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचा प्रवास. अकराव्या वर्षी महाराष्ट्राच्या U19 संघात तिची निवड झाली. कोणताही खेळ खेळणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा त्यांना अभ्यास आणि खेळ यापैकी एकाची निवड करावी लागते. स्मृती अभ्यासातही चांगली होती पण तिने क्रिकेटची निवड केली. ज्या वर्षी स्मृतीने क्रिकेटला प्राधान्य दिलं त्याच वर्षी गुजरातविरुद्ध २२४ धावांची तडाखेबंद खेळी केली.
मोठ्या शहरातील समकालीन खेळाडू चांगल्या मैदानांवर, उत्तम सोयीसुविधांसह सराव करत असताना स्मृती सांगलीत काँक्रीट पिचवर अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. सकाळी सराव, मग शाळा आणि संध्याकाळी पुन्हा सराव, हे शिस्तबद्ध आयुष्य स्मृती शालेय वर्षांमध्ये जगली. या सगळ्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे 2013 मध्ये भारतीय संघात तिची पहिल्यांदा निवड झाली.
2014 मध्ये ICC महिला T20 म्हणजेच महिला क्रिकेटच्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठी स्मृतीची भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्मृतीला बारावीची परीक्षा सोडावी लागली. मात्र त्याच दौऱ्यात स्मृतीने नैपुण्याची झलक दाखवली. तुम्ही छान खेळता एवढं पुरेसं नसतं कारण तुम्ही कोणाविरुद्ध आणि कुठे खेळता त्यावर तुमची पत ठरते. भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात टेस्ट मॅच जिंकली. आठ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने हा पराक्रम केला होता. या टेस्टमध्ये स्मृतीने अर्धशतक झळकावलं. त्यानंतर दोन वर्षात होबार्टच्या नदीकाठच्या मैदानावर तिने शतकी खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेतही तिची बॅट तळपली. आव्हानात्मक खेळपट्टी असो किंवा दर्जेदार गोलंदाजी- स्मृतीची बॅट बोलते. झूलन गोस्वामी, मिताली राज, हरमनप्रीत कौर या सीनिअर खेळाडूंच्या तालमीत तयार झालेल्या स्मृतीने हळूहळू कर्णधारपदाची धुराही सांभाळायला सुरुवात केली.
डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळात नजाकत असते. स्मृतीचे कव्हर ड्राईव्हचे देखणे फटके पाहताना अनेकांना सौरव गांगुलीचा भास होतो. स्मृतीसाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा हा आदर्श. स्मृतीच्या खेळाने ऑस्ट्रेलियातल्या महिला बिग बॅश स्पर्धेच्या आयोजकांना आकृष्ट केलं. ब्रिस्बेन हिट संघाने स्मृतीला ताफ्यात समाविष्ट केलं. इंग्लंडमध्ये ट्वेन्टी२० सुपर लीग स्पर्धेतही स्मृतीने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली आहे. स्मृतीच्या फटकेबाजीत क्रूरता जाणवत नाही. तिच्या फटकेबाजीतही कलात्मकता आहे.
गेल्या वर्षी फलंदाजीवर काम करण्यासाठी स्मृतीने ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला पसंती दिली. बॅटिंगच्या बरोबरीने कर्णधार म्हणून स्मृतीने स्वत:ला तयार केलं. वूमन्स प्रीमिअर लीगच्या गेल्या वर्षी झालेल्या पहिल्यावहिल्या हंगामात बंगळुरू संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलं होतं. फलंदाज महत्त्वाचे असतातच पण गोलंदाज तुम्हाला जिंकून देतात असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. वूमन्स प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या तिघीजणी स्मृतीच्या संघातल्या आहेत. बंगळुरूकर श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि सोफी मोलिन्यू या तिघींनी बंगळुरूच्या जेतेपदाचा मार्ग सुकर केला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्मृतीची मैत्रीण एलिसा पेरी अग्रस्थानी आहे. स्वत: स्मृती चौथ्या स्थानी आहे. फलंदाजी आणि कर्णधारपद अशी दुहेरी जबाबदारी हाताळण्यात स्मृती यशस्वी ठरली आहे.
काही वर्षांपूर्वी ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या ट्यूबवरच्या लोकप्रिय कार्यक्रमात स्मृतीने आजही सांगलीची सांबा भेळ वीक पॉइंट असल्याचं सांगितलं होतं. 2018मध्ये स्मृती आयसीसी वूमन्स क्रिकेटर ऑफ द इयर ठरली होती. वर्षभरातल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी तिला वनडे क्रिकेटर ऑफ द इअर सन्मानानेही गौरवण्यात आलं होतं. आयसीसीतर्फे निवडण्यात आलेल्या वनडे आणि ट्वेन्टी-20 संघातही स्मृतीचा समावेश करण्यात आला होता. फोर्ब्स इंडियाने प्रभावशाली युवा ३० व्यक्तिमत्वांमध्ये तिची निवड केली. २०१८ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
वर्षभरापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात अँकरने तिच्या नावाची घोषणा करताना नॅशनल क्रश असा उल्लेख केला होता. ब्युटी विथ ब्रेन्स याचं उत्तम उदाहरण असलेली स्मृती आता असंख्य ब्रँड्सचा चेहरा झाली आहे. क्रिकेटच्या अर्थकारणात स्मृती मन्धाना हा ब्रँड वेगाने मोठं होताना होताना दिसतो आहे. आरसीबीसारख्या वलयांकित संघाचा जेतेपदाचा दुष्काळ स्मृतीने संपुष्टात आणला आहे. स्मृतीपर्वाची ही नांदीच म्हणायला हवी.