महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाच्या उल्लेखनीय खेळीचा मंत्र
महिला विश्वचषकाच्या उपविजेतेपदामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षांव सुरू आहे. भारताच्या या अविश्वसनीय कामगिरीचा मजबूत पाया रचला तो महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने. साखळीच्या पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून ९० धावांच्या स्मृतीच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला. या विजयाने भारताच्या युवा खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि पुढे जे घडले त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. कर्णधार मिताली राजनेही या विजयाचे महत्त्व अधोरेखित केले.
स्मृतीने मोठा भाऊ श्रावण याच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले. बिग बॅश लीगमध्ये झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने मदानाबाहेर असलेल्या स्मृतीला विश्वचषक स्पध्रेत खेळण्याची संधी मिळेल की नाही याबबतही शासंकता होती. पण मिळालेल्या संधीवर तिने झोकात पुनरागमन केले आणि संघाच्या यशाचा पाया रचला.
‘‘या स्पध्रेतील प्रवास स्वप्नवत होता. लॉर्ड्सवर खेळण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले होते. २०१४मध्ये ती संधी आलेली, पण पावसामुळे सामना रद्द झाला. त्या वेळी मितू ताईने (मिताली राज) २०१७च्या विश्वचषक स्पध्रेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर आहे आणि सर्वोत्तम खेळ केल्यास त्या ठिकाणी खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरेल, असे सांगितले होते. ते स्वप्न खरे झाले, पण त्यावर जेतेपदाची मोहर उमटवता न आल्याची खंत आहे,’’ असे स्मृती म्हणाली.
सातारा ते लॉर्ड्स हा प्रवास याबद्दल तिने सांगितले की, ‘‘माझ्याकडे शब्दच नाहीत. भावाला पाहून क्रिकेटकडे वळले. तो डावखुरी फलंदाजी करायचा, त्यामुळे उजव्या हातानेही फलंदाजी करता येते, याची कल्पना नव्हती. मीही डावखुरी फलंदाजी शिकली. मॅथ्यू हेडनची आक्रमकता आणि कुमार संगकाराची तंत्रशुद्ध फलंदाजी मला भावली. पण त्यांच्यासारखे हुबेहूब खेळण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यांची फलंदाजी शिकावी म्हणून कधी त्यांचे व्हिडीओ पाहिले नाही.’’
विश्वचषक स्पध्रेत उपविजेतेपद पटकावले असले तरी स्मृती तिच्या खेळीवर समाधानी नाही. याबाबत ती म्हणाली, ‘‘संपूर्ण स्पध्रेत अंतिम सामना वगळता मी गोलंदाजाच्या अचूकतेमुळे बाद झालेली नाही. चुकीच्या फटक्यांमुळे स्वत:ची विकेट गमावली. त्यामुळे फलंदाजीवर अधिक काम करण्यासाठी प्रयत्नशील असेन.’’