इंग्लड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने सहा गडी गमावून १४२ धावा केल्या. तर भारतीय संघाने दोन गडी गमावून १४६ धावा करून सामना जिंकला. या सामन्यात स्मृती मंधानाची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. तिच्या खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी राखत विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघासाठी होता ‘करो या मरो’ सामना

भारतीय संघाला पहिल्या सामन्यात नऊ गडी राखत दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकात सहा गडी गमावून १४२ धावा केल्या. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने ५१ धावा केल्या, तर मायिया बाउचियरने ३४ धावा केल्या. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा : शिक्षण मंडळाचा स्ट्रेट ड्राइव्ह! बाबर आझमचा कव्हर ड्राइव्ह Physics च्या अभ्यासक्रमात; प्रश्न वाचून लोक म्हणाले याचं उत्तर तर बाबरलाही येणार नाही

स्मृती मंधानाची अफलातून फलंदाजी

१४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, शेफाली वर्मा २० धावा करून बाद झाली, तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या ५५ धावा झाल्या होत्या. भारताची दुसरी विकेट ७७ धावांवर पडली, जेव्हा दयालन हेमलता ९ धावांवर बाद झाली. यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात भागीदारी होत संघाने १६.४ षटकांत लक्ष्य गाठले.

हेही वाचा : डेव्हिस चषकासाठी अल्कराझ स्पेनमध्ये दाखल

स्मृती मंधाना म्हणाली, “मागील सामन्यानंतर आम्हाला मजबूत पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधायची होती. खराब फटका खेळून कुठल्याही प्रकारचा दबाव संघावर येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. एक सलामीवीर म्हणून बाहेर जाता आणि तुमच्या संघाला चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. यात मला योगदान देता आले याबद्दल आनंद आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana powers team india to a series levelling win by 8 wickets in second t20 match avw92