इंग्लंडमधील KIA Super League स्पर्धेत भारताच्या स्मृती मंधानाने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली आहे. वेस्टर्न स्ट्रॉम संघाकडून खेळताना स्मृतीने १८ चेंडूत ५० धावा पटकावल्या. लॉगबर्ग लाईटनिंग संघाच्या गोलंदाजांची स्मृतीने संपूर्ण सामन्यात अक्षरशः धुलाई केली. याच खेळीसोबत स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे. स्मृती KIA Super League स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. स्मृतीने या सामन्यात १९ चेंडूंमध्ये ५२ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

पावसाने व्यत्यय आणल्यामुळे वेस्टर्न स्ट्रॉम विरुद्ध लॉगबर्ग लाईटनिंग यांच्यातला सामना ६ षटकांचा करण्यात आला. यानंतर स्मृतीने रॅशेल प्रिस्टच्या साथीने गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. स्मृतीच्या या खेळीचं श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकारानेही ट्विटरवरुन कौतुक केलं आहे. संगकारा हा स्मृती मंधानाचा आवडता खेळाडू आहे.

Story img Loader