पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या हंगामात दडपणाखाली माझा आत्मविश्वास काहीसा कमी व्हायचा. मात्र, यंदा यावर मात करण्यात मी यशस्वी ठरले. दडपण असतानाही मला योग्य निर्णय घेता आले, असे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाची कर्णधार स्मृती मनधाना म्हणाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु फ्रेंचायझीला पहिले जेतेपद मिळवून देण्याचा मान मनधानाच्या नेतृत्वाखालील महिला संघाला मिळाला. बंगळूरुच्या पुरुष संघाला अद्याप एकदाही ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवता आलेले नाही. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळूरुने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करताना ‘डब्ल्यूपीएल’च्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले.

हेही वाचा >>>IPL 2024 : रोहित शर्माबद्दल ‘हा’ प्रश्न विचारताच, हार्दिक-बाऊचरने बाळगले मौन, VIDEO होतोय व्हायरल

‘‘गेल्या हंगामातून मी एक गोष्ट शिकले, ती म्हणजे स्वत:वरील विश्वास कायम राखणे. गेल्या वर्षी दडपणाखाली माझा आत्मविश्वास काहीसा कमी व्हायचा. निर्णय घेताना माझ्या मनात बऱ्याच गोष्टींबाबत संभ्रम असायचा. त्यामुळे मी स्वत:शीच संवाद साधला. परिस्थिती कशीही असो, आपण स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही असे मनाशी पक्के केले. मानसिकदृष्ट्या आपण कणखर राहायचे असे स्वत:ला सांगितले. याचाच मला यंदा फायदा झाला,’’ असे मनधाना म्हणाली.

कोहलीकडून अभिनंदन

महिला संघाच्या यशानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने लगेचच मनधानाचे ‘व्हिडीओ कॉल’ करत अभिनंदन केले. ‘‘स्टेडियममध्ये खूप आवाज होता, त्यामुळे तो नक्की काय म्हणाला, ते मला ऐकू आले नाही. त्याने मला अंगठा दाखवत अभिनंदन केले आणि मी त्याला हीच कृती करताना धन्यवाद म्हटले. तो खूप खूश होता,’’ असे मनधानाने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana the captain of women premier league winner royal challengers bangalore said that she was able to take the right decisions even under pressure sport news amy