भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघादरम्यान पाचव्या टी२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने ५४ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मंधाना चार धावा करून बाद झाली. यानंतर भारताने ५० धावांत तीन विकेट गमावल्या. कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोषही फ्लॉप ठरले आणि टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला. अखेर दीप्ती शर्माने अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या १४२ धावांपर्यंत नेली.
या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय महिला संघाची युवा डावखुरी फलंदाज स्मृती मंधानाने चाहत्यांना उद्देशून ट्विटर ट्विट करून एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणते, “आमची सर्वोत्तम कामगिरी एवढी चांगली नव्हती, पण आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू. आमच्यासाठी ही मालिका खूप मोठा शिकण्याचा अनुभव आहे. तुम्हाला मोठ्या संख्येने बाहेर पडताना आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा देता हे पाहून खूप आनंद झाला. आम्ही खूप कौतुक करतो. सर्वांना अभिमान वाटावा यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू”, अशा शब्दांत स्मृती मंधानाने चाहत्यांचे आभार मानले.
तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला चार षटकांत तंबूत पाठवून चांगली सुरुवात केली. यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार ताहिलाने आक्रमक फटके खेळत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. तो बाद झाल्यानंतर ऍशले गार्डनर आणि ग्रेस हॅरिस यांनी झंझावाती पद्धतीने धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार बाद १९६ पर्यंत नेली. ताहिला मॅकग्राने ६६ आणि ग्रेस हॅरिसने ६४ धावा केल्या. या दोघांमध्ये ६२ चेंडूत १२९ धावांची नाबाद भागीदारी झाली. दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, देविका वैद्य आणि अंजली सरवानी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
याच टी२० मालिकेदरम्यान, भारतीय महिलांनी दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सुपर ओव्हरमध्ये विजयरथ रोखला. सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयाची हिरो ठरली मराठमोळी स्मृती मंधाना. तिने ४९ चेंडूत ७९ धावांची खेळी करून मालिका बरोबरीत केली होती. मात्र अखेरचे सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. अशातच भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने तिच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. खरं तर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन मोफत सामने पाहायला मिळाले. बीसीसीआयने महिला क्रिकेटला प्राधान्य देत हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.