फुटबॉलमधील महासंग्राम अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धा अवघी एका महिन्यावर आली असताना यजमान ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा संतप्त चाहत्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. एका फुटबॉल सामन्यादरम्यान गोल झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एका चाहत्याने ‘एके-४७’मधून हवेत गोळीबार केला. विश्वचषक स्पर्धेसाठी अमाप खर्च केल्याच्या निषेधार्थ साव पावलो येथे रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा अवलंब करावा लागला.
साव पावलो आणि रिओ डी जानेरो या दोन प्रमुख शहरांमध्ये निदर्शकांची पोलिसांशी खडाजंगी उडाली. निदर्शकांनी टायर जाळत प्रमुख रस्त्यांवर ठिय्या मांडला होता. गेल्या वर्षीच्या कॉन्फेडरेशन चषकाच्या तुलनेने या वेळी निदर्शक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले नसले तरी हा ब्राझील सरकारसाठी धोक्याचा इशारा समजला जात आहे. सामाजिक प्रकल्प आणि पायाभूत सोयीसुविधांवर खर्च करण्याऐवजी ब्राझीलमध्ये फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेसाठी अमाप खर्च केला जात आहे, असे निदर्शकांचे म्हणणे आहे.
ब्राझीलचे यशापयश चाहत्यांवर अवलंबून
रिओ डी जानेरो : ब्राझीलवासीयांचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलचे यशापयश हे चाहत्यांवरच अवलंबून असणार आहे. ब्राझील संघ फिफा विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार असला तरी चाहत्यांचे प्रचंड दडपण ब्राझीलच्या जेतेपदाच्या मार्गात अडथळा ठरू शकते.
सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असलेल्या ब्राझीलचा सलामीचा सामना १२ जूनला क्रोएशियाविरुद्ध होणार आहे. घरच्या मैदानावर फिफा विश्वचषकाचे आयोजन करताना १९५० सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी पुन्हा एकदा ताजा झाल्या आहेत. ब्राझीलमध्ये झालेल्या या स्पर्धेत उरुग्वेने ब्राझील संघावर २-१ अशी मात करत यजमान चाहत्यांचा हिरमोड केला होता. पण या वेळी ब्राझील संघ घरच्या मैदानावर करिश्मा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘‘अन्य संघांपेक्षा आमच्याकडे एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे चाहत्यांची फौज. तब्बल २०० दशलक्ष चाहते ब्राझीलच्या विश्वविजेतेपदासाठी आसुसलेले आहेत. हेच संघासाठी सर्वात मोठे पाठबळ ठरणार आहे,’’ असे ब्राझीलचे प्रशिक्षक लुइझ फेलिपे स्कोलारी म्हटले होते.