रशियामधील सोची येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने क्रीडापटूंच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या सरकारने गंभीर पावले उचलली आहेत. दोन अमेरिकी युद्धनौका समुद्रात तैनात करण्यात आल्या असून, त्यांच्यामार्फत ऑलिम्पिक स्पध्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
सोची ऑलिम्पिकदरम्यान दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच अमेरिकेने युद्धनौका रवाना केल्या. या दोन्ही युद्धनौका रशियाच्या सैन्यदलाला सहकार्य करतील. या दोन्ही युद्धनौकांवर तब्बल ५०० सैनिक कार्यरत आहेत. दहशतवादी हल्ला होण्याची भीती निर्माण झाल्यास क्रीडापटूंच्या सुरक्षेसाठी या नौका प्रयत्न करतील, असे अमेरिकी नौदलाकडून सांगण्यात आले.
सोची ऑलिम्पिकची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करावी, असे अमेरिकेकडून रशियाला सांगण्यात आले होते. मात्र दहशतवादी हल्ल्यांची शक्यता रशियाकडून फेटाळण्यात आल्याने अमेरिकी क्रीडापटूंच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलण्यात आल्याचे अमेरिकी नौदलाने सांगितले.

टूथपेस्ट बॉम्बचा धोका
सोची ऑलिम्पिकदरम्यान रशियाचे विमान दहशतवाद्यांकडून टूथपेस्ट किंवा सौंदर्यप्रसाधन बॉम्बद्वारे उडवून देण्याची शक्यता आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकी एअरलाइन्सच्या विमानांनीही हा संभाव्य धोका लक्षात घ्यावा आणि रशियाला जाणाऱ्या विमानांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी, असे अमेरिकेच्या गृह विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

Story img Loader