स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत रिअल सोसिदादने बलाढय़ रिअल माद्रिदला बरोबरीत रोखले. मात्र बरोबरीमुळे चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी पहिल्यांदा पात्र ठरण्याचे सोसिदादचे स्वप्न भंगले. दरम्यान बार्सिलोनाने इस्पॅनयोलवर २-० असा विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी कायम राखली.
गोन्झालो हिग्युनने सहाव्या मिनिटालाच गोल करत रिअल माद्रिदचे खाते उघडले. मिकेल गोन्झालेझच्या पासचा सुरेख उपयोग करून घेत हिग्युनने शानदार सलामी दिली. हिग्युनचा हा हंगामातील पंधरावा गोल आहे. रिअल माद्रिदचा संघ या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो, सर्जिओ रामोस आणि झेबी अलोन्सो या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळला. हिग्युनच्या गोलनंतर दोन्ही संघांनी बचावावर भर दिल्याने गोलवृद्धी होऊ शकली नाही. ५७व्या मिनिटाला कॅलेजॉनने गोल करत रिअल माद्रिदची आघाडी बळकट केली.
मात्र यानंतर सामन्याचे पारडे फिरले. झेबी प्रिइटो आणि अँटोइनी ग्रिइझमन यांनी झटपट गोल करत सोसिदादला बरोबरी करून दिली. रिअल माद्रिदतर्फे सामी खेडिराने शानदार गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र सोसिदादच्या झेबी प्रिइटोने अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल करत बरोबरी केली.

Story img Loader