दमदार प्रदर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या बार्सिलोनाला ला लिगा स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. रिअल सोसिदादने बार्सिलोनावर ३-१ अशी मात केली. बार्सिलोनाच्या अनपेक्षित पराभवामुळे गुणतालिकेत रिअल माद्रिदने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. अन्य लढतीत रिअल माद्रिदने इल्क संघाचा ३-० असा धुव्वा उडवला.
चॅम्पियन्स लीग चषकाच्या मँचेस्टर सिटीविरुद्धच्या बहुचर्चित लढतीत विजयामुळे बार्सिलोनाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला होता.
बार्सिलोनाच्या अलेक्स साँगने स्वयंगोल केल्याने रिअल सोसिदाचे गोलचे खाते उघडले. मात्र या आक्रमणाला लगेचच प्रत्युत्तर देत बार्सिलोनातर्फे लिओनेल मेस्सीने डाव्या पायाच्या फटक्यावर सुरेख गोल केला. मात्र मध्यंतरानंतर अँटोइन ग्रिइझमन आणि झुर्टझा यांनी शानदार गोल करत सोसिदादला भक्कम आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळवल्यानंतर बचाव अभेद्य करत सोसिदादने बार्सिलोनाला गोल करू दिला नाही आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.  
आमच्याकडे चेंडूचे नियंत्रण नव्हते, त्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो. चेंडूवर ताबा मिळवणे ही आमची ताकद आहे. सोसिदादने ही गोष्ट लक्षात घेऊन डावपेच रचले होते आणि म्हणूनच त्यांनी विजय मिळवला अशी प्रतिक्रिया बार्सिलोनाचा बचावपटू गेरार्ड पिक्यूने व्यक्त केली.
बार्सिलोनाचे व्यवस्थापक गेराडरे मार्टिनो यांनी मँचेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यासाठीच्या संघात सहा बदल केले, मात्र हे बदल बार्सिलोनाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
अन्य लढतींत रिअल माद्रिदने एल्कवर ३-० असा सहज विजय मिळवला. असिर अल्लारमेंडी, गॅरेथ बॅले आणि इस्को यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेल्टा आणि गेटाफे यांच्यातील लढत १-१ तर अल्मेरिया आणि मलागा यांच्यातला सामना ०-० असा बरोबरीत सुटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा