सोमदेव देववर्मन व युकी भांब्री यांनी एकेरीत आपापले सामने सहज जिंकले, त्यामुळेच भारताला इंडोनेशियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत २-० अशी आघाडी घेता आली.
इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र इंडोनेशियन खेळाडू भारतीय खेळाडूंना कशी लढत देतात हीच उत्सुकता होती. भारतीय खेळाडूंनी मायदेशातील अनुकूल वातावरण व मैदानाचा पुरेपूर फायदा घेतला. सोमदेव याने एकेरीच्या पहिल्या लढतीत विष्णू अदी नुग्रोहो याच्यावर ६-१, ६-२, ६-२ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. पाठोपाठ भांब्री याने ख्रिस्तोफर रुंग्केट याचा ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला.
या लढतीमधील दुहेरीचा सामना शनिवारी होणार आहे. या सामन्यात भारताच्या लिएण्डर पेस व सनमसिंग यांना डेव्हिड सुसांतो व एलबर्ट सेई यांच्याशी खेळावे लागणार आहे. एकेरीचे परतीचे सामने रविवारी होणार आहेत. दुहेरीची लढत जिंकून सामन्यात ३-० अशी विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला शनिवारी मिळणार आहे.
सोमदेव याने पहिल्या एकेरीत विष्णूविरुद्ध फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. त्याने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. नंतरच्या दोन्ही सेटमध्येही त्याने प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. विष्णूला सोमदेवच्या वेगवान खेळापुढे आपला प्रभाव दाखविता आला नाही.
भांब्रीनेही सोमदेवचाच कित्ता गिरविताना सहज विजय मिळविला. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच व्हॉलीजचाही त्याने चांगला उपयोग केला. त्याच्या कल्पक खेळापुढे ख्रिस्तोफरचा बचाव निष्प्रभ ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा