खांद्याच्या दुखापतीतून सावरणाऱ्या भारताच्या सोमदेव देववर्मनला जागतिक क्रमवारीत अव्वल ६० खेळाडूंमध्ये धडक मारायची आहे. तंदुरुस्त होण्यासाठी आणि सातत्यपूर्ण खेळासाठी अथक परिश्रम करत असल्याचे सोमदेवने सांगितले.
‘‘२०१३ हे वर्ष माझ्यासाठी चांगले ठरले. जागतिक क्रमवारीत सहाशेवरून अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. पुढील वर्षीच्या नव्या हंगामात मला अव्वल ७५ खेळाडूंत आगेकूच करून अव्वल ६० खेळाडूंमध्ये स्थिरावण्याची चांगली संधी आहे,’’ असे सोमदेव म्हणाला.
सोमदेव सध्या रोहन बोपण्णा आणि अन्य अव्वल खेळाडूंसह हैदराबादमधील सानिया मिर्झा टेनिस अकादमीत सराव करत आहे. २००९मध्ये सोमदेवने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. सोमदेवच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, असे विचारले असता सोमदेव म्हणतो, ‘‘यंदाही दिमाखदार कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. काय होईल सांगता येत नाही मात्र अथक परिश्रम करणे माझ्या हाती आहे. चुका सुधारून सातत्यपूर्ण खेळ करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. चाहत्यांच्या अपेक्षांबाबत मला काहीही माहिती नाही. माझ्यासाठी मी काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. २०१४मध्ये दुखापती होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत अव्वल २०मध्ये असणाऱ्या खेळाडूंना मला टक्कर द्यायची आहे.’’

Story img Loader