दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या सोमदेव देववर्मनने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या
प्रकाश अमृतराजने दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. सोमदेवने अव्वल मानांकित चेक प्रजासत्ताकच्या जान हाजेकला ६-३, ६-३ असे नमवले तर प्रकाशने फ्रान्सच्या रुफीन गुईलौमी या अनुभवी खेळाडूवर ६-७ (४-७), ६-२, ६-२ अशी मात केली. या सामन्यासाठी अचूक अभ्यास करून आलेल्या सोमदेवने फोरहँडच्या फटक्यांचा प्रभावीपणे वापर केला. तब्बल सात बिनतोड फटके लगावणाऱ्या सोमदेवने तीनपैकी दोन ब्रेकपॉइंटही वाचवले. दोन्ही सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत सोमदेवने हा
सामना जिंकला. यंदाच्या वर्षांतला हा माझा पहिलाच सामना होता. दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळणे खूपच समाधानकारक आहे. माझी पुढची लढत अग्रमानांकित प्रतिस्पध्र्याविरोधात होणार आहे. माझा खेळ चांगला होत आहे आणि त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सोमदेवने विजयानंतर बोलताना सांगितले. दरम्यान तब्येत चांगली नसूनही प्रकाश याने तब्बल १४३ मिनिटांच्या या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर चतुरस्र खेळ करीत विजयश्री खेचून आणली. प्रकाशने मुख्य फेरीत स्थान मिळविताना लागोपाठ तीन खेळाडूंवर शानदार विजय मिळविला होता. ज्येष्ठ डेव्हिसपटू विजय अमृतराज यांचा
मुलगा असलेल्या प्रकाशने चिवट झुंज देत प्रेक्षकांना अव्वल दर्जाच्या टेनिसचा आनंद मिळवून दिला. पहिल्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी असूनही नंतर प्रकाशला
आपल्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नव्हते. तथापि दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा खेळावर नियंत्रण मिळविले आणि ते शेवटपर्यंत टिकविले.

Story img Loader