Australia vs Pakistan 3rd Test Match, David Warner: ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरने बुधवारपासून सुरू होणाऱ्या सिडनी कसोटीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाच्या नुकत्याच भारतात झालेल्या विश्वचषकात मोलाची भूमिका बजावली होती. त्याआधी त्याने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय स्वरूपात स्पर्धा सुरू ठेवण्याचा आपला मानस व्यक्त केला होता.

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डावखुऱ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाजाने सांगितले की, येत्या काही वर्षांत त्याची कामगिरी जर चांगली राहिली तर तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध करून देण्याचा विचार करू शकतो. संपूर्ण कारकिर्दीत वॉर्नरला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, वॉर्नरने सातत्याने त्याच्या विरोधकांना चांगली खेळी करून चुकीचे सिद्ध केले आहे, विशेषत: ज्यांना सुरुवातीला त्याच्या स्फोटक खेळण्याच्या शैलीमुळे कसोटी क्रिकेटसाठी त्याच्या योग्यतेबद्दल शंका व्यक्त केली होती तेच आज त्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: भारतीय संघ केपटाऊनला पोहोचताच मोहम्मद सिराज म्हणाला, “हॅपी न्यू इयर”; पाहा Video

डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “आवडी आणि नापसंती असे दोन प्रकार असतात. असे काही लोक आहेत जे कीबोर्डच्या मागे लपतात आणि वास्तविक जीवनात असेही लोक आहेत जे तुमच्याबरोबर बिअर प्यायला बसतात. तेच खरे लोक आहेत जे तुम्हाला वाईट काळात पाठिंबा देतात, आपण त्यांना ओळखायला हवे.” वॉर्नरने हा मिचेल जॉन्सनला टोमणा मारला.

वॉर्नर पुढे म्हणाला की, “माझ्याकडे त्यापैकी काही आहेत, जिथे मी लोकांना आमंत्रित केले आणि त्यांच्याबरोबर बिअर घेतली आणि त्यांनी त्यांचे माझ्याविषयीचे मत पूर्णपणे बदलले.” तो पुढे म्हणाला, “हे कदाचित चार, पाच, सहा वर्षांपूर्वीची घटना आहे. जसे तुम्ही वागता तसेच लोक तुमच्या आयुष्यात येतात. मी खूप प्रामाणिक आहे, माझं आत एक बाहेर एक असं काहीही नाही. माझ्याशी सार्वजनिकपणे असहमत असलेल्या कोणाशीही बिअर प्यायला मला नेहमीच आनंद होतो. तुम्ही टीव्हीवर जे माझ्याविषयी पाहता जर ते तुम्हाला आवडत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्या शंकेचे निरसन करेन. माझा विरोध करणाऱ्यांचा मी प्रतिस्पर्धी असेन पण शत्रू नाही. एवढेच मी जाता जाता सांगेन की मला तुम्ही जो काही पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.”

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार का? अ‍ॅलन डोनाल्ड म्हणाला, “ सेंच्युरियनच्या तुलनेत येथे काम…”

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ

दुसरीकडे तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. पर्थमधील पहिली कसोटी आणि मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, “सिडनी कसोटीसाठीही हाच संघ कायम ठेवण्यात आला आहे. आम्हाला कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवायचे आहे. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा कसोटी सामना आणि त्याच्या घरच्या मैदानावर त्याची अविश्वसनीय कारकीर्द साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”