भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू अजूनही आपण विश्वविजेते आहोत याच धुंदीत वावरत असून खेळाकडे ते अतिशय निष्काळजीपणाने पाहतात, असा आरोप भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीबाबत काही खेळाडूंवर अप्रत्यक्षपणे टीका करीत गावस्कर म्हणाले, ‘‘देश आपला ऋणी आहे, असेच या खेळाडूंना वाटत असून हे खेळाडू जमिनीपासून काही अंतरावरून चालत आहेत. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व गांभीर्याचा असण्याची आवश्यकता आहे, मात्र तसा दृष्टिकोन या खेळाडूंमध्ये दिसून येत नाही.’’
सचिन तेंडुलकरच्या विकेटविषयी विचारले असता गावस्कर म्हणाले, ‘‘इंग्लंडकडून पदार्पण करणारा जो रुट याच्याकडून भारतीय फलंदाजांनी धडा घेतला पाहिजे. त्याच्या खेळात किती छान संयम दिसून येत आहे. त्याने केलेल्या भागीदारी लक्षात घेतल्या पाहिजेत.’’

Story img Loader