फुटबॉलच्या मैदानावर एकमेकांना लाथा लागणे किंवा पायात पाय घालून पाडणे असे प्रकार अनेक वेळा घडत असतात. मात्र १९५८च्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सचा खेळाडू पॅट्रिक बॅटीस्टान याला आपले तीन दात गमवावे लागले. पश्चिम जर्मनीविरुद्धच्या सामन्यात तो आक्रमण करीत असताना जर्मनीचा खेळाडू टोनी शूमाकर याने आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा फटका पॅट्रिकच्या तोंडावर बसला. या फटक्यात एवढी ताकद होती की पॅट्रिक जमिनीवर कोसळला. त्याचे तीन दात तुटले व त्याच्या तोंडातून भळाभळा रक्त वाहू लागले. जर्मनीचा मायकेल प्लॅटिनी व त्याचे अन्य दोन तीन सहकारी लगेच पॅट्रिकपाशी पोहोचले. पॅट्रिकची शुद्ध हरपली होती. मैदानावरच त्याला ऑक्सिजन देण्यात आला व लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शूमाकर याच्यावर कारवाई होईल अशीच सर्वाना खात्री होती. मात्र डच पंच चार्ल्स कोव्हर यांनी फ्रान्सला पेनल्टी किक बहाल केली नाही तसेच शूमाकर याच्यावरही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे कोव्हर यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले, मात्र आपल्या निर्णयाशी ते ठाम राहिले.
सट्टे पे सट्टा : नीरस तरीही..
– निषाद अंधेरीवाला
फिफा फुटबॉल विश्वचषकातील शनिवारी होणारे सामने नीरस या गटात मोडतात, असे सट्टेबाजांचे म्हणणे आहे. तरीही सट्टाबाजारात या सामन्यांना जोर आहेच. ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात झालेल्या सामन्यात सट्टेबाजांना जे अपेक्षित होते तेच झाले. निकाल अनपेक्षित म्हणजे क्रोएशिया जिंकली असती तर सट्टेबाजांना मोठा फटका बसला असता; परंतु सट्टेबाज सध्या खुशीत आहे. कोलंबिया आणि ग्रीस तसेच उरुग्वे आणि कोस्टा रिका या सामन्यांमध्ये सट्टेबाजांना अनपेक्षित निकालाची अपेक्षा आहे. इटली आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याबाबतही पंटर्स आशावादी आहेत. इंग्लंडच्या बाजूने जुगार खेळला जात आहे. सट्टेबाजारातील जागतिक क्रमवारीत आजही ब्राझीलच आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ अर्जेटिना, स्पेन, जर्मनी, फ्रान्स यांचा क्रमांक लागतो. या विश्वचषकात सर्वाधिक गोल कोण करेल, यावरही सट्टा लावण्यात आला आहे. सध्या तरी नेयमार आणि लिओनेल मेस्सी यांच्यातच जोरदार स्पर्धा आहे.
आजचा भाव :
१. कोलंबिया ग्रीस
९० पैसे (१०/११); ४.५० रुपये (९/२)
२. इटली इंग्लंड
६० पैसे (१९/१०); २.२५ रुपये (२१/१०)
३. उरुग्वे कोस्टा रिका
४५ पैसे (५/११); ४ रुपये (९/१)
४. आयव्होरी कोस्ट जपान
७० पैसे (७/४); २ रुपये (२/१)
(कंसात आंतरराष्ट्रीय भाव)
शट आऊट : महोत्सवारंभ!
साऱ्या क्रीडा जगताला ज्याची आतुरता होती, तो फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ब्राझीलच्या विविधतेने नटलेला असला तरी त्याची रंगत मात्र चढलीच नाही. अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ, गायक पिटबुल व ब्राझिलमधील गायिका क्लाऊडिन्हा हे अवतरले आणि त्यांनी ‘वुइ आर वन, ओले, ओले, ओले, ओला..’ हे शीर्षकगीत सादर केले. यानंतर तब्बल पाचशे जणांनी ब्राझीलच्या विविध रंगांच्या छटा दाखवल्या.