खो-खो या देशी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने आणायचे असेल तर या खेळात काही तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच आता या खेळाचे सामने मॅटवर घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पुढचे पाऊल म्हणून राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मॅटची दोन क्रीडांगणे ठेवण्यात आली आहेत आणि या मैदानांवरील सामन्यांबाबत खेळाडू सध्या तरी आनंदी वाटत आहेत.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेकरिता एकूण पाच मैदाने ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी तीन मैदाने नेहमीसारखी मातीची आहेत. पुरुष व महिला या दोन्ही गटांतील खेळाडूंना मॅटवर खेळण्याची संधी मिळाली आहे. मातीच्या मैदानाप्रमाणेच मॅटवरही तितक्याच आक्रमकतेने खेळ होत आहे. पाठलाग करणाऱ्या खेळाडूंना सूर मारणे आता धोकादायक वाटत नाही. खेळताना उडी मारतानाही अडचण येत नाही, असे मत खेळाडूंनी व्यक्त केले. मात्र पाठलाग करताना एकदम थांबून आपल्या सहकाऱ्याला खो देताना पाय घसरला जात आहे असे काही खेळाडूंनी सांगितले. मातीत झटकन पाय रोवणे शक्य असते मॅटवर ते करणे शक्य नसते. कबड्डीमध्ये मॅटवर सामने घेताना खेळाडूंना पायात बूट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे, मात्र खो-खोमध्ये हा नियम करण्यात आलेला नाही. त्यामुळे काही खेळाडू बूट घालून खेळत आहेत तर काही खेळाडूंनी बूट न घालताच मॅटवर खेळणे पसंत केले. त्यामुळे खेळात अपेक्षेइतकी शान दिसून येत नाही.
मॅटची मैदाने हा थोडासा खर्चीक प्रकार आहे. बारामतीकरांना ते शक्य झाले कारण येथे कशाचीच कमतरता नाही आणि राज्य खोखो संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे या स्पर्धेचे संयोजकच असल्यामुळे नुसता शब्द टाकला की सर्व काही हजर होत आहे. ज्या ठिकाणी पैशाची कमतरता नाही अशा ठिकाणी मॅटची मैदाने शक्य आहेत. मात्र ग्रामीण भागात जर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करायची झाल्यास अशी मैदाने शक्य होणार नाहीत. तसेच ही मैदाने आणणे हीच मोठी त्रासदायक व डोकेदुखीची बाब आहे. त्यापेक्षा आणखी चार मैदाने तयार करणे सोपे आहे, असे अनेक संघटकांचे मत आहे. तसेच मॅटच्या मैदानांची जाडी सारखी पाहिजे. येथे दोन क्रींडांगणांच्या जाडीत थोडासा फरक आहे.
मॅटच्या मैदानावर दवबिंदू पकडण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर भारतात जेथे सतत पावसाळी हवा असते तेथे अशी क्रीडांगणे करणे त्रासदायक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. बंदिस्त सभागृहात मॅटची जास्तीत जास्त दोन किंवा तीनच मैदाने ठेवणे शक्य आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची संख्या मोठी असते. जर अशा मर्यादित मैदानांवरही स्पर्धा आयोजित करायची झाल्यास कमीत कमी एक आठवडय़ाचा कालावधी लागेल, असे मत काही संघटकांनी व्यक्त केले.

Story img Loader