संघातील आजी-माजी कर्णधारांमध्ये विस्तवही जात नाही, अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात नित्याचीच. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली Virat Kohli आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी MS Dhoni यांच्यामध्येही वितुष्ट असल्याच्या बातम्या काही जणांनी पसरवल्या. पण कोहलीने मात्र या बातम्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. धोनी आणि माझ्यामधील नाते अतूट असून या नात्यावर कसलाही परिणाम होणार नाही, असे कोहलीने सांगितले.

‘माझ्या आणि धोनीमध्ये चांगले नाते नाही, अशा गोष्टी बऱ्याच लोकांनी लिहिल्या आहेत. मी किंवा धोनी या दोघांनीही या प्रकारच्या बातम्या वाचलेल्या नाही, ही सर्वात चांगली बाब आहे. जेव्हा लोकं आम्हाला एकत्र पाहतात तेव्हा ते बुचकळ्यात पडतात,’ असे कोहलीने सांगितले.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने धोनीविषयी एक वक्तव्य केले होते. धोनी हा सात वर्षांच्या मुलासारखा मजा करत असतो, असे हेडनने म्हटले होते. याबाबत कोहली म्हणाला की, ‘हेडनला धोनी समजलेला नाही. धोनीमध्ये लहान मुलांसारखा उत्साह आहे. गोष्टी सोप्या कशा करता येतील, यावर धोनी जास्त भर देतो. त्याचबरोबर प्रत्येक वेळी काही तरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये धोनी असतो.’

धोनीबरोबर कोहलीचे नाते किती मोकळेपणाचे आहे, याचे एक उदाहरण दस्तुरखुद्द विराटने दिले. ‘मी १७ वर्षांखालील अकादमीचा एक सामना खेळत होतो. त्या वेळी एक नवीन मुलगा गोलंदाजी करत होता. त्याला मी विचारले कुठून गोलंदाजी करणार, त्यावर तो म्हणाला भैय्या मी नजफगढवरून आलो आहे, असा हा किस्सा होता. हा किस्सा मी धोनीला सांगितला आणि त्याला हसू फुटले. ही गोष्ट मी त्याला सामना खेळत असताना मैदानातच सांगितली. मैदानात आणि बाहेरही आमचे चांगले नाते आहे. मैदानात धावा घेताना जेव्हा धोनी दोन धावा घ्यायचा म्हणून सांगतो तेव्हा मी डोळे बंद करून त्या धावा पूर्ण करतो. कारण धोनीचा खेळाबद्दलचा अभ्यास फारच दांडगा आहे.

Story img Loader