भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती स्विकारण्याचे संकेत दिले आहेत. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत नावजलेली खेळाडू आहे. मात्र, गेल्या काही काळात तिला गुडघ्याच्या दुखापतीने सतावले आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर सायना पुन्हा सरावाला लागली असून तिने १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत होणारी चीन सुपर सीरिज प्रीमिअर आणि २२ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या हाँगकाँग खुली सुपर सीरिज या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. याबद्दल बोलताना तिने म्हटले की, मी स्वत:चा फिटनेस वाढविण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहे. तसेच सध्याच्या घडीला मी जय पराजयाचा विचार करत नाही. अनेक लोकांना मी पुनरागमन करू शकणार नाही, माझी कारकीर्द संपेल असे वाटते. माझ्या मनातदेखील खोलवर कुठेतरी हा विचार घोळत आहे. तेव्हा भविष्यात काय होते ते बघू?, अशी सूचक प्रतिक्रिया सायना नेहवालने व्यक्त केली. मी सध्या पुढील एका वर्षाचाच विचार करत आहे. येथून पुढे मी एक-एक वर्षाच्या टप्प्याचाच विचार करेन, मी पाच किंवा सहा वर्षांचा विचार करणार नाही, असेही यावेळी सायनाने म्हटले.
मी संपले असा विचार अनेक लोक करतात, याबाबत मला एकप्रकारे आनंदच वाटतो. कारण, लोक माझ्याबद्दल खूप विचार करतात. मात्र, आता तसे होणार नाही. सध्याची दुखापत काहीशी वेदनादायी असल्याने स्वत:च्या शरीराची काळजी कशी घ्यायची या गोष्टीला माझे सर्वप्रथम प्राधान्य असल्याचेही सायनाने सांगितले.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकप्राप्त सायनाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. प्राथमिक फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले. मायदेशी परतल्यानंतर तिच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये गुडघ्याचे संरक्षण करणाऱ्या कवचरूपी हाडाचा छोटा भाग विलग करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सायनाला ही दुखापत झाली. ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान दुखापत बळावली.
सायना नेहवाल हिच्यामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरूवात झाली होती. सायनाने आजपर्यंतच्या कारकीर्दीत ऑलिम्पिक पदकाबरोबरच मानाच्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची कामगिरी केली होती.