सट्टेबाजी व मॅचफिक्सिंगमुळे कारवाई करण्यात आलेल्या चेन्नई व राजस्थान संघांऐवजी नवीन दोन फ्रँचाइजी निवडण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे आयपीएल संयोजन समितीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आयपीएल संयोजन समितीची लवकरच तातडीची बैठक घेतली जाईल. त्यामध्ये न्यायाधीशांच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या सद्य:स्थितीबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. आमच्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून यापुढील कारवाई केली जाईल असे या अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘‘नवीन फ्रँचाइजींकरिता नवीन कंपन्यांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचे की नाही. चेन्नई व राजस्थान संघांमधील सर्व खेळाडूंना लिलावात सहभागी होण्याची संधी द्यायची की नाही, चेन्नई संघाचे त्यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीत विलीनीकरणासाठी परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय आगामी बैठकीत केला जाणार आहे.’’
‘‘चेन्नई व राजस्थान संघाचे मालक त्यांच्या फ्रँचाइजी अन्य कंपन्यांना विकण्याचा विचार करीत होते, मात्र न्यायाधीशांच्या निर्णयानंतर या प्रक्रियेस स्थगिती येणार आहे. या दोन्ही संघांची प्रतिमा मलिन झाली आहे. या फ्रँचाइजीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अत्यंत बारकाईने अभ्यास केला पाहिजे असे न्यायाधीशांनी सुचविले आहे. या दोन्ही फ्रँचाइजींमधील चाळीसहून अधिक खेळाडूंना पुन्हा लिलावात सहभागी होण्यापूर्वी संयोजन समितीने बारकाईने कायदेशीर बाबींचा अभ्यास केला पाहिजे असेही त्यांनी सुचविले आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आयपीएल २०१७ करिता नव्याने लिलाव आयोजित केला जाणार होता, मात्र त्याआधी नवीन दोन फ्रँचाइजींबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे.
न्यायाधीशांच्या निर्णयाचे स्वागतच आणि आदर-दालमिया
आयपीएल स्पर्धेतील सट्टेबाजीबाबत लोढा समितीने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करीत आहोत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले.
दालमिया यांनी सांगितले की, ‘‘न्यायाधीशांच्या निकालपत्राचा तपशील आमच्या कार्यकारिणीपुढे लवकरच ठेवला जाईल. न्यायाधीशांच्या निर्णयाचा आम्ही आदर करीत आहोत. त्याचे सविस्तर वाचन केल्यानंतरच आम्ही एकत्रितरीत्या निर्णय घेऊ. आयपीएल स्पर्धेचे कोटय़वधी चाहते आहेत. या स्पर्धेविषयी त्यांच्या मनात कोणतेही किंतू राहणार नाही या दृष्टीने आम्ही स्पर्धेच्या संयोजनात पारदर्शीपणा ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’
मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनीही दालमिया यांच्या मताशी सहमती दर्शविली.

Story img Loader