Sourav Ganguly Wishes BCCI For World Cup: आयसीसीने २७ जून रोजी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत प्रथमच संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी, भारताने संयुक्तपणे १९८७, १९९६ आणि २०११ एकदिवसीय विश्वचषकांचे आयोजन केले होते. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वेळी भारतात वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता, तेव्हा टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २८ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून ट्रॉफीवर कब्जा केला होता. भारत १२ वर्षांनंतर विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियाला आपला सर्वोत्तम खेळ दाखवून इतिहास रचायचा आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारत कोरोनामुळे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करू शकला नव्हता. आता भारतात विश्वचषक होत असताना सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष नाही. ज्याबद्दल सौरव गांगुली थोडा उदास दिसत आहे.

हेही वाचा – AUS vs ENG: लॉर्डस कसोटीत नॅथन लायनने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

संपूर्ण जग लक्षात ठेवेल – सौरव गांगुली

आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सौरव गांगुलीने ट्विटरवर लिहिले की, “भारतात होणाऱ्या विश्वचषकाची वाट पाहत आहे. कोविडमुळे अध्यक्ष असताना स्पर्धेचा आनंद घेता आला नव्हता. ही किती छान स्पर्धा असेल, सर्वोत्तम ठिकाण निवडले गेले आहे. भारतासारखी इतर कोणत्याही देशात इतकी ठिकाणे उपलब्ध नाहीत. जगाच्या लक्षात राहील अशा पद्धतीने बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल. जय शहा, रॉजर बिन्नी आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे खूप खूप अभिनंदन.”

सौरव गांगुलीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर रॉजर बिन्नीने त्याची जागा घेतली. सौरव गांगुलीच्या कार्यकाळात त्याच्यावर संघ निवडीत हस्तक्षेप केल्याचा आरोपही झाला होता.

हेही वाचा – Saba Karim: अजिंक्य रहाणेला नव्हे ‘या’ खेळाडूला उपकर्णधार करावे, भारताच्या माजी खेळाडूची मागणी

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेपॉक येथे ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळण्यापूर्वी टीम इंडिया ३० सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध सराव सामने आणि विश्वचषक क्वालिफायर संघासोबतही खेळणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील सर्वात मोठा सामना रंगणार आहे. पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात येणार की नाही याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly appreciates bcci for organizing and planing of odi world cup 2023 vbm