भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या सामन्यासाठी न्यूझीलंडला फेव्हरिट सांगितले आहे. आज दुबईच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगणार असून जगाला नवा विश्वविजेता मिळणार आहे. आत्तारपर्यंत या दोन्ही संघांनी टी-२० विश्वविजेतेपद मिळवता आलेले नाही.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी अतिशय रोमांचक सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला अत्यंत रोमांचक सामन्यात पराभूत केले. कारण ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे पाकिस्तानला पराभूत केले होते, त्यामुळे त्यांना यावेळी निश्चितच गती मिळेल. किवी संघ एकजुटीने खेळत आहे आणि या कारणास्तव ते कोणत्याही संघाविरुद्ध खूप धोकादायक ठरू शकतात.
सौरव गांगुलीने अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडला पाठिंबा दिला आहे. शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातील संवादादरम्यान तो म्हणाला, ”मला वाटते की जागतिक खेळात न्यूझीलंडची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलिया हा महान देश आहे, पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. क्रिकेटच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया जरी उत्कृष्ट असला तरी न्यूझीलंडचे चारित्र्य खूप आहे. टीव्हीवर जे पाहतो त्यापेक्षा त्यांच्याकडे अधिक प्रतिभा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. न्यूझीलंड हा छोटा देश आहे, पण त्यांच्याकडे खूप प्रतिभा आहे. मला असे वाटते की आता न्यूझीलंडची वेळ आली आहे.”
हेही वाचा – राहुल द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे मोठी जबाबदारी; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी मन वळवून…
गेल्या काही वर्षांत न्यूझीलंडची कामगिरी चांगलीच राहिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. त्याआधी २०१९ च्या विश्वचषकात ते अंतिम फेरीत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कोणाचे पारडे जड?
टी-२० मधील रेकॉर्डची तुलना करता ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर वर्चस्व राखले आहे. टी-२० मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १४ वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील नऊ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असून पाच सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. तर टी २० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकच सामना झाला आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकत रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.