पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माने कर्णधार म्हणून मला खूप प्रभावित केले. त्यामुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत तरी भारताने नेतृत्वबदल टाळावा आणि रोहितलाच तिन्ही प्रारूपांत कर्णधारपदी कायम ठेवावे, असे मत माजी कर्णधार व ‘बीसीसीआय’चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी रोहित आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्या जायबंदी असल्याने तो या दौऱ्याला मुकणार आहे. रोहित आणि हार्दिकच्या अनुपस्थितीत ट्वेन्टी-२० संघाचे सूर्यकुमार यादव, तर एकदिवसीय संघाचे केएल राहुल नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेत खेळण्यासाठी रोहितला ‘बीसीसीआय’ने गळ घातल्याची चर्चा होती. मात्र, याचा फारसा फायदा झालेला नाही. गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर रोहित आणि विराट यांनी क्रिकेटच्या या लघुत्तम प्रारूपापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भूषवण्यासाठी रोहितच योग्य आणि सर्वोत्तम पर्याय असल्याचे गांगुलीला वाटते.

हेही वाचा >>>IND vs AUS 4th T20: रिंकू-अक्षरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय, ३-१ ने जिंकली मालिका

‘‘क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत रोहितच भारतीय संघाचा कर्णधार असला पाहिजे. त्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे भारताला सध्या नेतृत्वबदलाची गरज आहे असे मला वाटत नाही. विश्वचषकात रोहित आणि विराट यांची कामगिरी आपण सर्वांनीच पाहिली. भारतीय क्रिकेटसाठी त्यांची भूमिका अजूनही किती महत्त्वाची आहे, हे यंदाच्या विश्वचषकातून सिद्ध झाले,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘विश्वचषक स्पर्धा आणि द्विदेशीय मालिका यात खूप फरक आहे. विश्वचषकात खेळताना खेळाडूंवर वेगळेच दडपण असते. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ जेतेपदापासून दूर राहिला असला, तरी त्यांची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी उत्कृष्ट होती. आता सहा-सात महिन्यांत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या स्पर्धेतही भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करेल अशी मला आशा आहे,’’ असेही गांगुलीने नमूद केले.

रोहित एक उत्तम कर्णधार आहे. तो २०२४च्या ट्वेन्टी२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या कर्णधारपदी कायम राहील अशी मला अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी रोहित आणि विराटने विश्रांती घेतली आहे. त्यांचा हा निर्णय योग्यच आहे. त्यांनी १९ नोव्हेंबरला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आणि त्याच्या तीन दिवसांतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी२० मालिकेला सुरुवात झाली. विश्वचषकादरम्यान खेळाडूंवर खूप दडपण असते. त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. यातून बाहेर पडणे सोपे नसते. त्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली ही चांगलीच गोष्ट आहे. –सौरव गांगुली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly believes that rohit sharma is the right captain amy
Show comments