मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनीऐवजी विराट कोहली हाच योग्य कर्णधारपद सांभाळू शकेल. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनी कर्णधारपदावर टिकल्यास मला आश्चर्य वाटेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
‘‘राष्ट्रीय निवड समितीने याबाबत आतापासूनच विचार केला तर भविष्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करणे शक्य होईल. धोनी हा गेली नऊ वर्षे कर्णधारपद भूषवीत आहे. हा खूप दीर्घ कालावधी आहे. त्याने उत्कृष्टरीत्या नेतृत्व सांभाळले आहे. मात्र आणखी चार वर्षांनी तो तेवढय़ा कुशलतेने प्रभाव दाखवू शकेल काय, याची मला शंकाच वाटते. त्याने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो भाग घेत आहे. अर्थात एक खेळाडू म्हणून धोनीने खेळत राहाव,े असे मला वाटते,’’ असे गांगुली या वेळी म्हणाले.
‘‘कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये भारताचे चांगल्या रीतीने नेतृत्व केले आहे. त्याच्याकडे प्रत्येक स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रत्येक दिवसामागे त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे,’’ असेही गांगुली यांनी सांगितले.